चिरा दिल्याविना पोटातून काढली इंजेक्शनची सुई
By admin | Published: December 31, 2015 03:30 AM2015-12-31T03:30:32+5:302015-12-31T03:30:32+5:30
दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाच्या पोटात इंजेक्शनची सुई ४५ सेंटिमीटर आत गेली. मुलाच्या पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली.
तीन वर्षाच्या मुलावर उपचार : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील घटना
नागपूर : दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाच्या पोटात इंजेक्शनची सुई ४५ सेंटिमीटर आत गेली. मुलाच्या पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली. सुपर स्पेशालिटीच्या गॅस्ट्रो एंट्रॉलॉजी विभागात मंगळवारी ४५ मिनिट दुर्बिण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही सुई बाहेर काढण्यात आली. यासाठी मुलाच्या पोटाला किंवा कुठल्याच भागाला चिरा देण्याची गरज पडली नाही. गॅस्ट्रो एंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाचे यशस्वी आॅपरेशन करण्यात आले.
हिंगणा येथील रहिवासी तीन वर्षाचा विशाल सैनी एका दंत महाविद्यालयात दाताच्या समस्येमुळे उपचारासाठी गेला. तेथील डॉक्टरच्या चुकीमुळे इंजेक्शनची सुई त्याच्या तोंडातून पोटात ४५ सेंटिमीटर आत गेली.
ही सुई ड्युडिनम नावाच्या आतड्यात जाऊन फसली. या सुईचा हिरव्या रंगाचा भाग आत फसला. एक्स रे मध्ये हे स्पष्टपणे दिसत होते. सोमवारी दुपारी ३ वाजता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मुलाला दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत हे रुग्णालय बंद झाले होते. मंगळवारी मुलाचा दुर्बिण पद्धतीने आॅपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुधीर गुप्ता यांनी डॉ. अमोल समर्थ, डॉ. अभय, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. तुषार सखलेचा, तंत्रज्ञ सोनल गट्टेवार आणि परिचारिकांसोबत आॅपरेशनबाबत चर्चा केली. तीन दशकांपासून गॅस्ट्रो एंट्रॉलॉजीच्या क्षेत्रात सक्रिय डॉ. सुधीर गुप्ता यांनी सावधानपूर्वक तोंडातून ही सुई बाहेर काढली. ही सुई अतिशय धारदार होती. ती कुठेही अडकू शकली असती. (प्रतिनिधी)