...म्हणून 'त्या' बिबट्याचा झाला मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 03:16 PM2022-11-08T15:16:30+5:302022-11-08T15:16:56+5:30
जखमी झाल्याने शरीरात रक्तस्त्राव झाला व त्याचे बहुतेक अवयव खराब झाले
नागपूर : वाहनाची धडक लागल्याने गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी तो वर्धा रोडवर जखमी अवस्थेत आढळला होता. जोरात धडक लागल्याने शरीरामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे किडनी, आतडे, फुप्फुस आदी अवयव खराब झाले व यात त्याचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटेच्या सुमारास मिहान परिसरात शुअरटेक रुग्णालयासमोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरात धडक दिली. यामुळे जखमी झालेला बिबट रस्त्याच्या कडेला झुडपात जाऊन बसला. या दरम्यान, रस्त्यावरून सायकलने जात असलेल्या ज्ञानेश्वर ठाकरे नामक सुरक्षारक्षकावर बिबट्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद करून त्याला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी बिबट्याचा उपचार सुरू केला. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू मृत्यू झाला.
यानंतर गोरेवाडाच्या वन्यप्राणी बचाव केंद्राच्या डल्ब्लूआरटीसीमध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. विच्छेदनाच्या अहवालानुसार, आंतरिक अवयव खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झाल्याने शरीरात रक्तस्त्राव झाला व त्याचे बहुतेक अवयव खराब झाले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.