जखमी वाघिणने सात तास रेल्वे मार्ग अडविला; घटनास्थळी मोठा ताफा

By नरेश डोंगरे | Published: November 15, 2024 11:12 PM2024-11-15T23:12:08+5:302024-11-15T23:21:32+5:30

प्रचंड दहशतीमुळे तब्बल सात तासानंतर रेस्क्यू

Injured tigress blocked the railway track for seven hours On the Tumsar Tirodi railway line | जखमी वाघिणने सात तास रेल्वे मार्ग अडविला; घटनास्थळी मोठा ताफा

जखमी वाघिणने सात तास रेल्वे मार्ग अडविला; घटनास्थळी मोठा ताफा

नागपूर : जखमी वाघिण जास्त खतरनाक असते, हे सर्वश्रूत आहे. त्यात ती निमुळत्या जागेत असेल आणि कुणी तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ती काय करेल याचा नेम नसतो. रेल्वेने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका वाघिणीसाठी तिची आक्रमकताच धोक्याची ठरली. मदतीसाठी पथक जवळ असतानादेखिल तब्बल सात तास ती जखमांनी विव्हळत, गुरगुरत राहिली. दरम्यान, वनविभागाने ती बेशुद्ध पडल्याची खात्री केल्यानंतरच तिला उपचारासाठी घटनास्थळावरुन हलविले. थरारक अशी ही घटना तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावर आज पहाटे ५.३० च्या सुमारास घडली.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात रेल्वेची ही स्वतंत्र लाईन आहे. तुमसरहून मध्य प्रदेशातील तिरोडी रेल्वे स्थानकापर्यंत ४ वेळा या गाडीचे जाणे-येणे होते. नेहमीप्रमाणे आज पहाटे ही गाडी तिरोडीकडे निघाली. नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात डोंगरी बुजुर्गजवळच्या टेकड्यांच्या जवळ कोणता तरी मोठ्या प्राण्याला रेल्वेची धडक बसल्याचे लोको पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करून गार्डच्या मदतीने पाहणी केली. मात्र, प्रचंड धुके असल्यामुळे त्यांना काही दिसले नाही. परंतू, मनातील शंका दूर करण्यासाठी लोको पायलट तसेच ट्रेन मॅनेजरने आरपीएफ तसेच रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. ते भल्या सकाळी घटनास्थळी पोहचले. ट्रॅकच्या बाजुला एक पट्टेदार वाघिण पडून दिसली. बाजुलाच तिची शेपटी तुटून पडली होती. ही माहिती आरपीएफने वनविभागाला कळविली. त्यानंतर भंडारा येथील उप-वन संरक्षक राहुल गवई, एसीएफ सचिन निलख, भोंगाड़े, संजय मेंढे, वन परिक्षेत्राधिकारी अपेक्षा शेंडे, मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान आपल्या ताफ्यासह पोहचले. मोठा ताफा आणि लोकांची गर्दी पाहून वाघिण चवताळली. ती चक्क रेल्वे ट्रॅकच्या मधोमध येऊन बसली. तिचा आक्रमक पवित्रा उपस्थितांना धडकी भरविणारा होता. त्यात वनविभागाच्या पथकाजवळ पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे जखमी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे गवई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तब्बल सात तास संघर्ष करावा लागला. पेंच तसेच गोरेवाड्यातील वरिष्ठांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन अखेर तिला बेशुद्ध करण्यात आले.

स्पेशल गाडी बोलवली

अपघात किंवा दुरूस्तीसाठी वापरण्यात येणारी रेल्वेची विशेष छोटी गाडी बोलवून घेण्यात आली. त्यात जाडजूड वाघिणीला उचलून टाकल्यानंतर तिला दुपारी १ वाजता घटनास्थळावरून हलविण्यात आले. तोपर्यंत हा रेल्वे ट्रॅक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. जखमी वाघिणीची स्थिती गंभीर असल्याचे उपवन संरक्षक गवई यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Injured tigress blocked the railway track for seven hours On the Tumsar Tirodi railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.