गंगाजमुनातील इमारत दुर्घटनेतील जखमी तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 10:51 PM2019-08-01T22:51:38+5:302019-08-01T22:52:18+5:30
उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गंगाजमुना परिसरात नामदेव रेवतकर यांच्या मालकीची जुनी इमारत होती. सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीर्ण झालेली ही इमारत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास कोसळली होती. यावेळी इमारतीलगतच्या शेड मध्ये सुमित्रा, राधा शिरसाट (वय ४०), प्रियंका कर्मावत (वय २६), पुनम कर्मावत (वय २५) आणि साक्षी कर्मावत (वय २४) उभ्या होत्या. भिंतीचा मलबा अंगावर पडल्याने त्यात त्या दबल्या. अन्य महिला आणि तरुणी आरडाओरड करीत तेथून पळाल्या. आरडाओरड ऐकून मोठ्या संख्येत धावलेल्या नागरिकांनी मलब्यात दबलेल्या महिला-तरुणींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचेही जवान पोहचले. मलब्यात दबलेल्य सर्व जणींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील सुमित्रा हिला गुरुवारी सकाळी खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. देवदास श्रीराम गुद्दावत (वय ४५, रा. शंकरपुर वस्ती, बवानपुरा, ता. हिंडोली, राजस्थान) यांनी दिलेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.