नागपूर विमानतळावर ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखम होण्याचा क्रम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:39 PM2020-06-23T15:39:37+5:302020-06-23T15:42:50+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईबाबत बोलण्यास संबंधित अधिकारी टाळत आहेत.
७ जून रोजी ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखमी होण्याची तक्रार आली होती. त्यानंतर विमानतळ व्यवस्थापनाला जवळपास आठ तक्रारी मिळाल्या आहेत. या सर्व तक्रारी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. यानंतरदेखील तक्रारी येत आहेत. नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या शाईमुळे होणाऱ्या जखमांच्या प्रकरणांना गंभीरतेने घेतले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यासंबंधात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मुंबईत नोकरी करणारे स्नेहा व राकेश मून हे ५ जून रोजी पुणेमार्गे विमानाने नागपुरात पोहोचले होते. विमानतळावर ‘स्टॅम्प’ लावण्यात आलेली जागा सुजली होती. दोघांचाही उपचार करावा लागला. संबंधित शाई ही अतिशय निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे ‘इन्फेक्शन’ व जखम झाली. त्वचेवर शाईचा उपयोग करण्याच्या अगोदर त्याचा दर्जा व इतर बाबींची तपासणी झाली पाहिजे, असे मत ‘फिजिशिअन’ डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केले. याअगोदर गोवा व कोकणातदेखील असे प्रकरण झाले आहे.
सर्व तक्रारी मनपाकडे जातात
यासंदर्भात आम्हाला ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जितक्या तक्रारी मिळाल्या, त्या सर्व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ‘ऑनलाईन’च पाठविण्यात आल्या आहेत. १३ जून रोजी शाई बदलविण्यात आली होती, असे मनपाने सांगितले आहे.
-आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक
‘टॅटू’सारखे ‘स्टॅम्पिंग’ केले जातेय
हवाई प्रवास करून नागपुरात आल्यानंतर सोमवारी एका प्रवाशाने नाव न प्रकाशित करण्याच्या नावावर धक्कादायक माहिती दिली. ‘क्वारंटाईन’ करण्याच्या नावाखाली केवळ ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्पिंग’ केले जाते. स्केच पेनाने तारीख लिहिली जाते व ती पाण्याने लवकरच मिटते. ज्या जागेवर ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्प’ लावल्या जात आहे तेथेच जळजळ होते. यासाठी कुठली शाई वापरण्यात येत आहे व यात कुठले रसायन आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.