वडेट्टीवारांवर अन्याय, कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:04 PM2020-01-06T13:04:02+5:302020-01-06T13:15:57+5:30

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेल्या दुय्यम खात्यामुळे ते प्रचंड नाराज असून आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याचे पक्षात बोलले जात आहे.

Injustice to Vedettawar, discomfort in Congress | वडेट्टीवारांवर अन्याय, कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता

वडेट्टीवारांवर अन्याय, कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता

Next
ठळक मुद्देपक्षश्रेष्ठींना कळविली भावनाआठवडाभरात धक्कादायक निर्णय घेणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेल्या दुय्यम खात्यामुळे ते प्रचंड नाराज असून आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याचे पक्षात बोलले जात आहे. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. मागील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला असे दुय्यम खाते मिळाल्याने विदर्भातील काही कॉंग्रेस नेते, कार्यकर्तेही नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॉंग्रेसच्या प्रतिकूल काळात वडेट्टीवार यांनी विदर्भात कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले. विरोधी पक्षनेता या नात्याने अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी विदर्भातील कॉंग्रेस उमेदवारांना तन मन धनाने सहकार्यही केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. भाजप-सेना युती सरकारच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे बाळू धानोरकर यांना पक्षात आणून त्यांना निवडून आले. महाराष्ट्रात कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आल्याचे श्रेय वडेट्टीवार यांनाच गेले.

वडेट्टीवार हे चिमूर येथून दोनदा आमदार होते व ब्रम्हपुरीतून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. नारायण राणेंसोबत ते कॉंग्रेसमध्ये आले. राणे दुसऱ्या पक्षात गेले, परंतु वडेट्टीवार यांनी कॉंग्रेस सोडली नाही.

मागील सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील नेत्यांकडे मुख्यमंत्रीपदासह, गृह, वित्त, वन, सामाजिक न्याय इत्यादी महत्त्वाची खाती होती. असे असताना वडेट्टीवार यांना दुय्यम खाते का दिले असा सवाल समर्थकांकडून होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी विजय वडेट्टीवार यांना संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. परंतु कॉंग्रेसमधील खात्रीलायक सूत्रांनुसार त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे स्पष्ट शब्दांत कळविल्याचे समजते. या आठवड्यात या अनुषंगाने ते एखादा धक्कादायक निर्णय घेऊ शकतात अशीही माहिती आहे.

नियोजित दौरे रद्द

मंत्रीपद मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आले होते. परंतु त्यांनी स्वागतसमारंभास उपस्थित रहायलादेखील नकार दिला आहे. त्यामुळे ते कार्यक्रम रद्द झाले आहेत.शिवाय नियोजित दौरेदेखील रद्द झाले असून नेमके कारण सांगण्यास त्यांच्या कार्यालयाकडून नकार देण्यात आला आहे.

Web Title: Injustice to Vedettawar, discomfort in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.