नागपूरकरांसाठी अभिनव महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:20 PM2020-05-06T22:20:15+5:302020-05-06T22:25:21+5:30
कोरोनामुळे एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्यावतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.नागपुरातील प्रत्येक परिवाराला या स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्यावतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.नागपुरातील प्रत्येक परिवाराला या स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गायकच असावे, असे बंधन नाही. ही स्पर्धा प्रत्येक कुटुंबासाठी असून कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्ती यात सहभागी होऊ शकतील.
‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या संकल्पनेखाली ही स्पर्धा असून यात भक्तिगीत, सिनेगीत अथवा देशभक्ती गीत गाता येईल. एका कुटुंबाला तीन वर्गवारीपैकी कुठल्याही दोन वर्गवारीमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी वेगवेगळे प्रवेश अर्ज दाखल करावे लागतील. स्पर्धा पूर्णपणे डिजिटल माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्जात स्पर्धेसाठी तयार केलेला फक्त १०० एमबी आकाराचा व्हिडिओ जोडायचा आहे. गीते ही हिंदी अथवा मराठी भाषेतील असावी. व्हिडिओतील गीतांचा कालावधी पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा. यामध्ये आपल्या कुटुंबातीलच सदस्यांचा समावेश असेल. आॅडिओट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर करता येईल. स्वतंत्र वाद्यवृदांचा समावेश केलेली गीते स्पर्धेत सहभागी केली जाणार नाहीत. गीतांची निवड, त्यातील सकारात्मक संदेश, एकूण सादरीकरण, वेशभूषा या बाबींचा परीक्षणादरम्यान विचार करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्जासह व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १५ मे राहील.
तिन्ही गटातील विजेत्या पारिवारिक चमूंना प्रथम महापौर चषक व रु. २१ हजार रोख, द्वितीय रुपये १५ हजार रोख, तृतीय रु. ११ हजार रोख तसेच रु. एक हजारचे पाच प्रोत्साहन पुरस्कार प्रमाणपत्रासह नागपूर महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येतील.
असा घ्यावा प्रवेश
प्रवेशासाठी आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.ttps://forms.gle/nRVcxPgUJ21tibky8 या लिंकवर गुगल फार्म उपलब्ध आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज, अधिकृत ट्विटर हॅण्डल आणि इन्स्टाग्रामवर ही लिंक उपलब्ध राहील.