रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

By नरेश डोंगरे | Published: January 21, 2024 11:15 PM2024-01-21T23:15:16+5:302024-01-21T23:15:45+5:30

कोट्यवधी रामभक्तांनी अनेक वर्षे जे स्वप्न कुरवाळले ते प्रत्यक्षात अनुभवण्याची घटिका आता जवळ आली आहे. त्यामुळे रामभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Innumerable air journeys of Ram devotees; Bhajans and Ram devotees chanted Ramnama | रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

नागपूर : नागपूरच्या विमानतळावरून अयोध्येच्या दिशेने विमान झेपावले. या विमानात बसलेल्या एक दोघांचा अपवाद वगळता सर्वच प्रवासी रामभक्तीत तल्लीन झाले. हा प्रसंग होता फ्लाइटमधील. रविवारी दुपारी अयोध्येच्या दिशेने निघालेल्या नागपूर-नाशिक आणि इंदोरमधील रामभक्तांनी चक्क आकाशातच रामनामाचा गजर करीत हवाई प्रवास करण्याचा अनोखा अनुभव घेतला.

कोट्यवधी रामभक्तांनी अनेक वर्षे जे स्वप्न कुरवाळले ते प्रत्यक्षात अनुभवण्याची घटिका आता जवळ आली आहे. त्यामुळे रामभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रत्येक जण शक्य होईल, त्या पद्धतीने आपली भक्ती, श्रद्धा आणि आनंद व्यक्त करीत आहे. अयोध्येतील मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी कोट्यवधी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रामभक्त विमान कंपन्यांच्या मनमानी दरांना न जुमानता महागडे तिकीट घेऊन अयोध्येकडे झेपावत आहेत. या पार्श्वभूमीवर, देशभरातील विविध प्रांतांतील, असंख्य भाविकांसह नागपुरातीलही रामभक्तांनी आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अयोध्येला जाण्यासाठी गर्दी केली. दुपारी १२:४५ वाजता इंदोर-लखनऊ मार्गे अयोध्येकडे हे विमान झेपावले. या विमानात मुंबई, पुणे, तर काही नाशिक येथील रामभक्तांचाही समावेश होता. पुढे त्यांना इंदोर विमानतळावर बसलेल्या रामभक्तांचीही साथ मिळाली आणि आकाशातून अयोध्येकडे झेपावलेल्या या विमानात लखनऊपर्यंत या प्रवासी भक्तांनी रामनामाचा गजर केला. महिला, पुरुष सर्वांनीच एक ताल, एक सुरात टाळ्यांचा ठेका धरत रामाचे भजन आणि हनुमंताचे दोहे गायले.



अत्यानंद ... भारावलेले... विलक्षण अनुभव
भव्यदिव्य श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होताना अयोध्येत उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हे जेवढे अलाैकिक आहे. तेवढाच आज विमान प्रवासात आलेला अनुभव अत्यानंद देणारा आहे. नभात झालेला रामनामाचा गजर म्हणजे विलक्षण अनुभव होय, अशी भावना या अभूतपूर्व प्रकाराचे साक्षीदार ठरलेले रामभक्त अविनाश शेगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Innumerable air journeys of Ram devotees; Bhajans and Ram devotees chanted Ramnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.