देवळीतील मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करा!
By admin | Published: September 8, 2016 02:44 AM2016-09-08T02:44:57+5:302016-09-08T02:44:57+5:30
हरतालिका पूजनासाठी गेलेल्या पाच विद्यार्थिनी आणि एका महिलेचा बंधाऱ्यातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : चौकशी समितीची पहिली बैठक
हिंगणा : हरतालिका पूजनासाठी गेलेल्या पाच विद्यार्थिनी आणि एका महिलेचा बंधाऱ्यातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नऊ सदस्यीय समितीची बैठक पार पडली. या घटनेचा पोलीस स्वतंत्रपणे तपास करतील तसेच लघुसिंचन विभागानेदेखील आपल्या स्तरावर चौकशी करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) शिवारात रविवारी (दि. ४) सकाळी हरतालिका पूजनासाठी गेलेल्या सहा जणींचा बंधाऱ्यातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. बुधवारी पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माजी आ. विजय घोडमारे, जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे, माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर, सरपंच पुरुषोत्तम गोतमारे, बाबा येनुरकर व बाल्या मलोडे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी घटनास्थळी जाऊन केलेल्या मोक्का चौकशीचा अहवाल व तयार केलेली चित्रफितीची सीडी बैठकीत ठेवण्यात आली. शिवाय या समितीने ठरविल्याप्रमाणे पोलीस विभाग व लघुसिंचन विभाग यांना विभागीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेचा पोलीस स्वतंत्रपणे घटनास्थळासह इतर बाबींचा तपास करतील व लघु सिंचन विभागही आपल्या स्तरावर चौकशी करणार आहे. ज्या विभागाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवाल लागेल त्यांना देण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
मात्र या बैठकीला उपस्थित काही सदस्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांमार्फत असमाधान व्यक्त केले. त्यामुळे आता मुख्य अभियंत्यामार्फत चौकशीची मागणी केली आणि ती मान्य करण्यात आली. बैठकीमध्ये मृताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे व बाबा आष्टनकर यांनी दिली. (प्रतिनिधी)