उमरेड येथे इंजेक्शनच्या काळाबाजाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:44+5:302021-05-30T04:08:44+5:30
उमरेड : रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब या इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी उमरेड येथील आर्चएंजल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होमिओपॅथीच्या डॉक्टरला अटक झाली. फैजाम खान ...
उमरेड : रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब या इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी उमरेड येथील आर्चएंजल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होमिओपॅथीच्या डॉक्टरला अटक झाली. फैजाम खान वल्द सागीर अहमद खान पठाण (२९) असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या औषधोपचारातील इंजेक्शनच्या या काळाबाजार प्रकरणाच्या चौकशीचे चक्र उमरेडच्या दिशेने फिरले आहे. उमरेड येथे शनिवारी अंबाझरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद म्हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर, पोलीस हवालदार अमित भुरे यांच्यासह आर्चएंजल हॉस्पिटल येथे पोहोचले. दुपारी १२.३० च्या दरम्यान आलेल्या या चमूने चार ते पाच तास चौकशी केली. फैजाम खान याच्या अटकेनंतर उमरेडचे आर्चएंजल हॉस्पिटल या काळाबाजारप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. शिवाय उपचारादरम्यानचे अनेक किस्से चर्चेत येत आहेत. या चमूने याप्रकरणी संपूर्ण माहिती घेत आर्चएंजलचे डॉ. जगदीश तलमले यांचेही बयान नोंदविले. फैजाम खान हा उमरेडच्या आर्चएंजल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ‘आरएमओ’ म्हणून कर्तव्यावर होता. शिवाय ऑगस्ट २०२० पासून या हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मंजुरी प्रदान करण्यात आली. आतापर्यंत ४५० ते ५०० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, तब्बल हजारावर रेमडेसिविर आणि २१ टॉसिलिझुमॅब इंजेक्शन आले होते, अशी माहिती डॉ. जगदीश तलमले यांनी दिली. नागपूर येथील झोन दोनच्या पथकाने सचिन गेवरीकर, विशेष ऊर्फ सोनू बाकट आणि रामफल वैश्य यांना याप्रकरणात अटक केली होती. सोबतच सापळा रचून फैजाम खान याच्याही मुसक्या आवळल्या गेल्या. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या फैजाम खानला पोलिसी हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. शनिवारी अंबाझरी पोलिसांची चमू या काळाबाजाराची चौकशी करण्यासाठी उमरेड येथील आर्चएंजल हॉस्पिटलला पोहोचली. याप्रकरणी सदर हॉस्पिटलमधून चौकशीदरम्यान रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार झाला की नाही, याबाबत संपूर्ण चौकशी केली जात आहे. शिवाय या गोरखधंद्यात अजून कोण सहभागी आहे, यांचा म्होरक्या कोण, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात चौकशीअंती मिळणार आहेत. डॉ. जगदीश तलमले यांच्या आर्चएंजल हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शशिकांत कुशवाह यांनी केली आहे.
--
उमरेड पोलीस ठाण्यात रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब प्रकरणाबाबत अंबाझरी पोलीस पथकाची एन्ट्री घेण्यात आली आहे. या तपासात चमू आली होती. याव्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. तो त्यांच्या तपासाचा भाग आहे.
- यशवंत सोलसे पोलीस निरीक्षक, उमरेड
--
फैजाम खान आमच्याच हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणाबाबत मला काहीही माहीत नाही. आम्ही, आमचे हॉस्पिटल चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.
- डॉ. जगदीश तलमले आर्चएंजल हॉस्पिटल, उमरेड