पुरावे मिळाल्यास मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:09 AM2021-02-08T04:09:08+5:302021-02-08T04:09:08+5:30
अजित पवार : आभा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार चव्हाट्यावरही आले ...
अजित पवार : आभा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार चव्हाट्यावरही आले आहेत. भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यास तत्काळ चौकशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. गतकाळात नागपूर महापालिकेसह केंद्र तसेच राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री नागपूरचेच असताना नागपूर शहराला याचा कुठला उपयोग झाला? नागपूर शहर क्राईम सिटी कशी ठरली, असा सवालही पवार यांनी केला़
शांतीनगर येथील लॉनमध्ये आयोजित मेळाव्यात अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल होते. गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या समारंभात सामील झाले होते. व्यासपीठावर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनिल अहिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.
नागपूर शहरात प्रसाधनगृहांची वानवा आहे. मनपाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सायकल खरेदीतही मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली. याशिवाय कोट्यवधींच्या भ्रष्टाचारांची मालिका या महापालिकेत गाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा पैसा कुणी लुबाडला असेल तर कायदा सर्वांसाठीच सारखा आहे, येथील सत्ताधाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असा इशारा पवार यांनी दिला़ महापालिकेत सफाई कर्मचारी झालेल्या ऐवजदारांना सातवा वेतन आयोगासाठी संबंधित विभागाची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी दिले़
....
विदर्भातील अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर
विदर्भातील अनेक बडे नेते हे राष्ट्रवादी पक्षात सामील होण्याकरिता उत्सुक असल्याचे पवार यांनी सांगितले. आभा पांडे यांची क्षमता मनपासाठी नव्हे तर विधानसभेत पोहोचण्याची आहे. याबाबत विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
....
सिमेंटच्या जंगलात मोठा भ्रष्टाचार : खासदार पटेल
भाजपची महापालिकेसह राज्य आणि केंद्रातही सत्ता असताना व नागपूर शहरातील मुख्यमंत्री असताना जे होणे अपेक्षित होते तसे काहीही दिसून येत नाही. विकासाच्या नावाखाली केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करण्यात आले. यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. शहराची बेरोजगारी मिटविण्याची क्षमता असलेल्या मिहानमध्येही हवा तसा विकास साध्य करता आला नसल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला