कचरा प्रक्रिया कंत्राटाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:04+5:302021-09-09T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच कंपनीला देण्यात येणाऱ्या कंत्राटात मनपा आणि स्मार्ट सिटीच्या रकमेमध्ये तफावत आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच कंपनीला देण्यात येणाऱ्या कंत्राटात मनपा आणि स्मार्ट सिटीच्या रकमेमध्ये तफावत आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला बुधवारी सभागृहात दिले.
भांडेवाडी परिसरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी कंपनीला मनपाद्वारे कंत्राट देण्यात आले. यानंतर स्मार्ट सिटीद्वारे दुसरे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे कंत्राट याच कंपनीलाच देण्यात आले. दोन्ही कंत्राटाच्या रकमेत फरक असल्याने याची चौकशी व्हावी, कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रवीण दटके यांनी सभागृहात केली. महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी कंपनीच्या कंत्राटात ट्रान्सपोर्ट स्टेशन मुद्दा उपस्थित केला. नगरसेविका परिणिता फुके, माजी महापौर नंदा जिचकार यांनी घनकचरा संकलन साठ्यावरून प्रश्न उपस्थित केला.
..
इंदूरच्या धर्तीवर कचरा संकलन - आयुक्त
कचरा कलेक्शन सेंटर महत्त्वाचे आहे. ट्रान्सपोर्ट स्टेशनच्या निविदा झाल्या, परंतु जागा मनपाच्या मालकीच्या नव्हत्या. काही ठिकाणी नागरिकांचा विरोध आहे. पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून विरोध शांत करण्यास सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, नासुप्र यांच्याकडून आपण जागा मिळाल्यानंतर इंदूरच्या धर्तीवर कचरा संकलनाची व्यवस्था उभी होईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
...
सरकारच्या योजनांसाठी पाच सदस्यीय समिती
केंद्र व राज्य शासनाकडून जनहिताच्या विविध योजना लागू करण्यात येतात. या योजना शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अंमलात आणण्याची जबाबदारी मनपाची आहे. या योजनांकरिता प्राप्त होणारा निधी, त्यासाठी आवश्यक पाठपुरावा, निधीचे नियोजन यासाठी मनपाची पाच सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला. नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी हा प्रश्न उपस्थित केला.