वाळूज येथील भूसंपादन आणि विकास कामांच्या दिरंगाईची चौकशी हाेणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
By आनंद डेकाटे | Published: December 15, 2023 04:32 PM2023-12-15T16:32:10+5:302023-12-15T16:33:19+5:30
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाणार.
आनंद डेकाटे, नागपूर : सिडको महामंडळाच्या वाळूज (छत्रपती संभाजीनगर) प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ मार्च २०२३ रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल, तसेच येथील कामांना झालेल्या दिरंगाईबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले. तसेच यासंदर्भात पुढच्याच आठवड्यात बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदस्य प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार वाळूज प्रकल्पातील महानगर-१, २ व ४ च्या संपादनासाठी प्रलंबित असलेल्या १२४.४० हे.आर. क्षेत्रापैकी सिडकोने आगाऊ ताबा घेऊन विकसित केलेल्या ७.३६ हे.आर. क्षेत्राचे संपादन करून उर्वरित क्षेत्र संपादनामधून वगळण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने जिल्हाधिकारी यांना सादर केला. हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे मान्यतेस्तव सादर झाला. या प्रस्तावानुसार प्रलंबित असलेले क्षेत्र संपादनातून निरधिसूचित (डिनोटीफाय) करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी मान्यता दिल्यानुसार याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसात नोटीफिकेशनही काढले जाईल. सदस्य हरीभाऊ बागडे यांनीही या चर्चेत भाग घेतला.