२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:09 AM2021-09-14T04:09:54+5:302021-09-14T04:09:54+5:30
नागपूर : बालकांमधील कृमिदोष कमी व्हावा व बालक सशक्त आणि सुदृढ बनावे यासाठी वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे ...
नागपूर : बालकांमधील कृमिदोष कमी व्हावा व बालक सशक्त आणि सुदृढ बनावे यासाठी वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते; परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने वाटप रखडले आहे. परिणामी, बालकांमध्ये कृमिदोषाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात याचा दर २८ टक्के आहे.
कृमिदोषाचा संसर्ग मुलांना दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमिदोष हा व्यापक असून, मुलांना आरोग्याच्या दृष्टीने अशक्त करणारा आहे. मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी शहरात महानगरपालिकेच्या, तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते; परंतु कोरोनाचे ग्रहण या गोळ्या वाटपांनाही लागले आहे.
-वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके व ७ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी वाटप मोहीम राबविली जाते; परंतु शाळाच बंद असल्याने वाटप थांबले आहे. अनेक मुलांमध्ये कृमिदोष दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-काय आहे जंतदोष
आतड्यांमध्ये वाढणारे जंत म्हणजे जंतदोष. (कृमिदोष) याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव. या कृमिदोषांचा संसर्ग मुलांना दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमिदोष हा आरोग्याच्या दृष्टीने अशक्त करणारा असतो. कृमिदोषामुळे रक्तक्षय आणि कुपोषण तर वाढतेच बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते.
-आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा, 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येतो. या दिवसांपासून पुढील काही दिवस १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाकडून, तर शहरात महानगरपालिकेकडून जंतनाशक गोळी वाटप केले जाते.
-गोळ्यांसाठी यांच्याकडे संपर्क साधा
शहर आणि ग्रामीण भागात जंतनाशक गोळ्यांच्या वाटपाची जबाबदारी आशा वर्कर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. या गोळ्या महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर व ग्रामीणमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत.
-शहरात ८०० वर आशांकडून गोळ्यांचे वाटप
शहरात पूर्वी ४५० आशा वर्कर होत्या. त्यात वाढ करून ८०० करण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्याने आशा वर्कर घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करणार आहेत. याशिवाय, मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांवरही या गोळ्या उपलब्ध आहेत.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी, (दवाखाने) मनपा