विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे; नागपुरातल्या क्रीडा प्रबोधिनीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:59 AM2019-07-16T11:59:31+5:302019-07-16T11:59:55+5:30
राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नागपुरातील कोराडी रोडवरील मानकापूर क्रीडा संकुल येथे असलेल्या क्रीडा प्रबोधिनीतर्फे राज्यभरातील निवडक विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येत असते. त्याच अनुषंगाने १० जूनपासून व्हॉलिबॉल आणि अॅथ्लेटिक्स क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणासाठी राज्यभरातून ४० विद्यार्थी संकुलात दाखल झाले आहेत. हे प्रशिक्षण वर्षभरासाठीचे असते. मात्र, प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
शौचालयात पाणी नाही, शौचालयातील पाणीच जेवण बनविण्यासाठी वापरले जाते, दोन्ही वेळ दिले जाणारे जेवण निकृष्ट प्रतीचे आहे, सर्वत्र घाण असून स्वच्छता कर्मचारी नाही, जेवणात सोंडे आढळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मौखिक स्वरूपात संबंधितांना दिल्या. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर, या समस्यांची माहिती देणारे लेखी पत्र तक्रार स्वरूपात क्रीडा प्रबोधिनीच्या वॉर्डनला दोनवेळा देण्यात आले. वॉर्डनकडून या तक्रारी सोडविल्या जात नसल्याचे समजताच, विद्यार्थ्यांनी तक्रारींचा मोर्चा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांच्याकडे वळवला. मात्र, तक्रारी ऐकून घेण्याऐवजी प्राचार्यांनी तक्रारकर्त्या मुलांवरच हात उगारल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तक्रारींचे निवारण करण्याऐवजी मुलांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करीत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास प्रबोधिनीच्या ४० विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात एकसाथ तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने आदित्य बाळकृष्ण बुधेल यांच्यासह आकाश दुर्गे, सचिन जाधव, रोहन यादव, मुकुल खोडके, धनुष कांबळे, सोहेल खान, आदर्श वाकोडे, वैभव भंगे, रितेश माने या विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री प्रबोधिनीच्या वॉर्डन, प्राचार्य व प्रशासकाविरोधात तक्रार
नोंदवली आहे.
मेस चालकाला शनिवारी टर्मिनेट करणार-सुभाष रेवतकर
मुलांनी गेल्या आठवड्यात जेवणासंदर्भात तक्रार केली होती. मेस चालकाला जेवणात सुधारणा करण्यासंदर्भात सांगितलेही होते. पण, सोमवारी विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे आरडाओरड केली. त्यामुळे मेस चालकाला बोलावून घेतले. त्याला समजवीत असताना मुले तिथे आली आणि मेस चालकाला शिवीगाळ करू लागली आणि त्याच्या अंगावर धावून गेली. त्यामुळे मी मुलांवर चिडलो. पण मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. माझा उद्देश केवळ शनिवारपर्यंत मेस सुरू ठेवण्याचा होता. शनिवारी मेस चालकाला टर्मिनेट करणार आहे. तोपर्यंत मुलांना दोनवेळचे जेवण मिळावे, ही अपेक्षा होती. त्यात मुलांवर मी रागावलो. माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता, असे प्राचार्य सुभाष रेवतकर म्हणाले.