एक बंदर ‘विद्यापीठ’ के अंदर
By Admin | Published: October 28, 2014 12:29 AM2014-10-28T00:29:07+5:302014-10-28T00:29:07+5:30
एरवी विद्यार्थ्यांनी कितीही डोक आपटून आपली समस्या सांगितली तरी त्याला विद्यापीठाकडून थंडपणे प्रतिसाद दिला जातो. विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाला वेग देणे भल्याभल्यांना जमले नाही.
नागपूर : एरवी विद्यार्थ्यांनी कितीही डोक आपटून आपली समस्या सांगितली तरी त्याला विद्यापीठाकडून थंडपणे प्रतिसाद दिला जातो. विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाला वेग देणे भल्याभल्यांना जमले नाही. अनेक अधिकारी व प्राधिकरण सदस्य तर ‘हम किसीसे कम नही’ अशा तोऱ्यात वावरतात. परंतु जे बड्या लोकांना जमले नाही ते एका माकडाने करून दाखविले. गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अक्षरश: धिंगाणा घालणाऱ्या या माकडाच्या धसक्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर महानगरपालिकेच्या पथकाने या मर्कटाला सोमवारी सायंकाळी जेरबंद केले अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून माकड फिरत होते. तीन दिवसांपासून हे माकड अचानक चवताळले व त्याने काही कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. कर्तव्यावर असलेले कर्मचारी कृष्णा धुर्वे यांना तर जोरदार चावा घेऊन त्यांचा हात रक्तबंबाळ केला. त्यांना त्वरित इस्पितळात नेण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये माकडाची दहशत आणखी पसरली. अखेर महानगरपालिका तसेच वनविभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली.