सह पोलीस आयुक्तांकडून न्यायालय सुरक्षेची पाहणी
By admin | Published: February 28, 2015 02:24 AM2015-02-28T02:24:37+5:302015-02-28T02:24:37+5:30
जिल्हा न्यायालय आवारातील ‘ओल्ड ट्रेझरी बार रूम’समोर गुरुवारी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत शुक्रवारी सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी...
नागपूर : जिल्हा न्यायालय आवारातील ‘ओल्ड ट्रेझरी बार रूम’समोर गुरुवारी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत शुक्रवारी सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी न्यायालय सुरक्षा संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली.
पाहणीच्या वेळी सह पोलीस आयुक्तांसोबत उपायुक्त संजय लाटकर, सदरचे पोलीस निरीक्षक रफिक बागवान, न्यायालय सुरक्षा पोलीस चौकीचे प्रमुख उपनिरीक्षक विजयकुमार वाकसे उपस्थित होते. पाहणीनंतर येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.
काल मोहम्मद साबीर अली आणि हनी गोविंदप्रसाद तिवारी हे आपापल्या साथीदारांसह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयातील कॉटन मार्केट खुनी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी आले होते.
हनी हा या खटल्यात आरोपी आणि साबीर अली हा फिर्यादी साक्षीदार म्हणून आला होता. सुनावणीला वेळ असल्याने ते न्यायालयाच्या बाहेर थांबले होते. ओल्ड ट्रेझरी इमारतीतील माधवी एन्टरप्रायजेससमोर अचानक अली आणि त्याच्या साथीदारांनी अक्षय किशोर तिवारी आणि हनी तिवारी यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते.
आज या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक राखुंडे यांनी मोहम्मद साबीर अली रा. कामगारनगर टेका नाका याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. पारवानी यांच्या न्यायालयात हजर केले. हल्ल्यात सहभागी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन अटक करणे आहे, आरोपींकडे आणखी शस्त्रे होती काय, याबाबत तपास करून शस्त्रे जप्त करणे आहे, आदी बाबी सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. (प्रतिनिधी)