नीरीमध्ये लोणार सरोवरातील पाण्याची बुधवारपासून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:35 PM2020-06-16T21:35:20+5:302020-06-16T21:36:59+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला आहे. त्यामागे काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी नीरीमध्ये बुधवारपासून पाण्याची तपासणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला आहे. त्यामागे काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी नीरीमध्ये बुधवारपासून पाण्याची तपासणी केली जाणार आहे.
लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलून लालसर गुलाबी झाला आहे. असे पहिल्यांदा झाले आहे. या चमत्काराची देशभर चर्चा होत आहे. ही घटना शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे. बुलडाणा वन्यजीव विभागाने सरोवरातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीकरिता नीरीकडे पाठविले होते. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने नमुने घेण्यासाठी नीरीची चमू स्वत: लोणारला गेली होती. त्यांनी सरोवरातील पाण्याचे नमुने घेऊन नीरीत आणले आहेत. नीरीचे वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ व जल विभाग प्रमुख डॉ. पवनकुमार लाभसेटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नमुन्यांची बुधवारपासून तपासणी केली जाईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार याचा दोन आठवड्यात अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करायचा आहे.