रिद्धपूर रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विशेष चमूकडून तपासणी
By नरेश डोंगरे | Published: February 8, 2024 08:20 PM2024-02-08T20:20:34+5:302024-02-08T20:20:49+5:30
या ऐतिहासिक स्थळावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते.
नागपूर: महानुभाव पंथियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या रिद्धपूर येथील रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विशेष पथकाने आज तपासणी केली.
या ऐतिहासिक स्थळावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. त्यामुुळे रिद्धपूरचे रेल्वे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. त्यामुळे या रेल्वेस्थानकावर येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना कशा प्रकारच्या सुविधा मिळतात, त्यांचा दर्जा काय आहे, हे तपासण्यासाठी वरिष्ठ विभागीय अभियंता राजेश चिखले आणि याच आठवड्यात रुजू झालेले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे पथक आज रिद्धपूर स्थानकावर पोहचले.
या पथकाने तेथील फलाटं, कव्हर शेड, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता गृह, प्लॅटफॉर्मची बॉउंड्री वॉल आदींची बारकाईने तपासणी केली. स्थानकावरील अधिकाऱ्यांना या संबंधाने काय कमी, काय जास्त ते विचारून प्रवाशांना अधिकाधिक चांगली सुविधा कशी देता येईल, त्यासंबंधाने चर्चा केली. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायी प्रवासाची अनुभूती देण्यासाठी कुठलिही कसर राहू नये, अशा सूचना वजा निर्देशही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून देण्यात आले.