प्रेरणादायी : फटाके नको, पुस्तके हवीत.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:58 PM2018-11-03T23:58:05+5:302018-11-04T00:00:00+5:30

३,२९० शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पत्रं पोहचविण्यात आली. परिपाठात मुलांना हे पत्र वाचून दाखवा, सूचना फलकावर, दर्शनी भागावर पत्र लावा, अशा कोणत्याही सूचना न देता पत्र मुलांपर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले.सर्वच शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी हे पत्र मुलांपर्यंत पोहचविले.

Inspirational: Do not want crackers, want books! | प्रेरणादायी : फटाके नको, पुस्तके हवीत.!

प्रेरणादायी : फटाके नको, पुस्तके हवीत.!

Next

आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात. कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो, तर कुणाला नवे कपडे, वस्तू खरेदी करून मिळत असतो. कुणाला तो फटाके फोडून मिळतो. फराळाच्या पदार्थांवर ताव मारणे म्हणजे दिवाळी असेही अनेकांना वाटत असते. दिवाळीत आनंद शोधण्याचा अनेक जण अनेक प्रकारे प्रयत्न करतात. अनाथालयात फराळ पाठविणे, वृद्धाश्रमात गोडधोड घेऊन जाणे, झाडे लावणे, गावाकडील शाळा, सामाजिक संस्थांना भेटी देणे, अशा प्रकारेही दिवाळी साजरी करणारे लोक आपल्या पाहण्यात आले असतील. कुठे अशांविषयी वाचनातही आले असेल.
हो, दिवाळीच्या सुटीत फराळासोबत दिवाळी अंकांवर ताव मारणारे वाचकही आमच्याकडे भरपूर आहेत. सामाजिक आनंदाला अवांतर वाचनाची जोड असणारा दिवाळी हा एकमेव सण अन् अशी परंपरा अजूनही टिकवून ठेवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. एकूणच दिवाळीत वाचन करून आनंद शोधण्याची चांगली परंपरा आमच्याकडे आहे. ती आम्ही टिकवून ठेवली आहे याचा आम्हा सर्व मराठीजनांना सार्थ अभिमान असायला हवा, नाही का?
शाळेत समाजाचे सर्व प्रतिबिंब दिसत असतात. नागपंचमी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस, होळी, बैसाखी अशा सर्वच सणांविषयी आणि सामाजिक उपक्रमांविषयी मुलांना वेळोवेळी माहिती दिली जाते. सण, उत्सवांचे फायदे-तोटे लिहिण्याचे गृहपाठ, प्रकल्प मुलांना दिले जातात. यातून थोडी चर्चा घडते. मुलांना वर्तमानाचा वेध घेण्याची सवय लागते. या दिवाळीचा असाच सदुपयोग आम्ही करून घेतला. दिवाळीत ‘फटाके नको’ असा सूर पर्यावरणवादी घेत असतात.
फटाके का नकोत? याचा प्रत्यक्ष अनुभव तीन वर्षांपूर्वी मी घेतला. त्यावेळी माझी मुलगी अडीच वर्षांची होती. आम्ही दिवाळीत माझ्या बहिणीकडे सुरतला गेलेलो. ते ज्या कॉलनीत राहत होते त्या ठिकाणी सारे लोक खूपच उत्साहाने फटाके फोडत होते. आम्ही हे सगळं आनंदाने गॅलरीतून पाहत होतो. फटाक्याचा आवाज झाला की ती दचकून रडू लागली. हे थांबवावे तरी कसे? असा प्रश्न सर्वांना पडला. थांबवणार ही कुणाला? किती लोकांना आपण फटाके फोडू नका, असं म्हणू शकू? आणि महत्त्वाचं, ऐकतील तरी किती? हे सर्व अशक्य असल्याने जे होत आहे ते निमूटपणे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. रडता-रडता माझी मुलगी उद्वेगाने म्हणाली ‘पप्पा, त्यांना जाऊन सांगा ना.’ माझ्या चिमुकलीचे हे शब्द माझ्या मनात कोरले गेले. या मुलांना नव्हे, पण आपलं जी मुले ऐकतात त्यांना मात्र नक्की सांगायचा निर्धार मी केला. दिवाळीत फटाके न फोडण्याच्या उपक्रमाविषयी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या कानावर टाकले. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. दिवाळीत फटाके फोडू नये, असे सांगतानाच त्याला काही पर्याय सुचविता येईल का? अशी त्यांनी विचारणा केली; आणि मग पुस्तक वाचनाची कल्पना समोर आली.
छंद आहेत ना!
गेली चार वर्षे फटाके नको हा उपक्रम राबवीत असतानाच या वर्षी थोडा वेगळा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळीत पुस्तकांसोबतच छंद आणि प्रकल्पांना वेळ देण्याचा आग्रह मुलांना धरला जाणार आहे. ‘मुलांनो, दिवाळीत घरी असाल तर फटाके न फोडता छंदांना वेळ द्या. फटाक्यांना नाही म्हणा. कुणी फटाक्याची जबरदस्ती करीत असेल तर त्यांना, ‘फटाके कशाला? छंद आहेत ना!’ असं सांगायला विसरू नका. पुस्तके वाचा. कथा लिहा. कविता करा. फराळाचे व खायचे विविध पदार्थ कसे बनवितात याचं एखादं तुमचं स्वत:चं होम मेड रेसिपी बुक तयार करा. प्राणी, पक्षी, वाहने यांच्या माहितीसह चित्रांचा संग्रह करा. वर्तमानपत्राची माहिती देणारी कात्रण वही तयार करा. किल्ले बनवा. कागदापासून विविध वस्तू तयार करा. त्यांचा संग्रह करा. . गाणी गा. ती रिकॉर्ड करून ठेवा. संगीताचा आनंद घ्या.

आमीन चौहान

Web Title: Inspirational: Do not want crackers, want books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.