‘प्रेरणा’ची प्रेरणादायी प्रेरणावाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:01 PM2018-05-28T12:01:52+5:302018-05-28T12:02:01+5:30
प्रेरणा यलमंचली एक उच्चशिक्षित तरुणी आगळीवेगळी वाट धरीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक तरुण-तरुणी हे उच्च शिक्षण घेऊन लठ्ठ पगाराची नोकरी करीत ऐषोआरामात आयुष्य घालवण्याचे स्वप्न रंगवित असतात. परंतु उच्च शिक्षण घेऊन एनजीओच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे. त्यातही महिला व लहान मुलांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणारे तरुण निराळेच.
अशीच एक उच्चशिक्षित तरुणी आगळीवेगळी वाट धरीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी काम करीत आहे. हिंसक होत चाललेल्या आजच्या तरुण पिढीबाबत तिला चिंता असून भावी पिढी सामाजिकदृष्ट्या सुदृढ, विचारशील, विनयशील व संस्कारक्षम व्हावीत, यादृष्टीने तिने कार्यक्रम तयार केला असून आजच्या तरुणांसाठी ती खऱ्या अर्थाने ‘प्रेरणा’ ठरली आहे.
प्रेरणा यलमंचली असे या तरुणीचे नाव. ती अवघ्या २३ वर्षाची आहे. सेमिनरी हिल्स येथे ती आपल्या आई-वडिलांसोबत राहते. वडील व्यंकटरमणा हे वेकोलिमध्ये कार्यरत आहेत तर आई गायत्री वात्सल्य या स्वत:च वात्सल्य या नावाने एनजीओ चालवतात. गतिमंद मुलांसाठी त्या काम करतात. प्रेरणाला एनजीओमध्ये काम करण्याची प्रेरणा आपल्या आईकडूनच मिळाली. गतिमंद असलेल्या मुलांसाठी काम करीत असताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा, तो अप्रतिम असायचा. त्याची तुलनाच करता येत नाही, असे प्रेरणा आवर्जून सांगते.
आईच्या पावलावर पाऊल ठेवत १२ वी झाल्यानंतर प्रेरणाने पुणे सिम्बॉयसिस येथून ‘मीडिया स्टडीज’मध्ये ग्रॅज्युएशन केले. जर्नालिझम हा तिचा आवडीचा विषय. यानंतर तिने युकेमधून ‘वूमन स्टडीज’मध्ये मास्टर डिग्री घेतली. विदेशात शिकल्यावर ती कुठेही चांगल्या पगाराची नोकरी सहज करू शकली असती. परंतु ती भारतात परतली.
मुंबईतील अतिशय बदनाम अशा कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसाय करणाºया महिला व त्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओमध्ये तिने कामाला सुरुवात केली. या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून तर अधिकारी व वेगळ्या लोकांशी संवाद साधण्याचे काम प्रेरणा मोठ्या जबाबदारीने सांभाळते. या एनजीओमध्ये कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून ती कार्यरत आहे. कामाठीपुरा येथे बाहेरगावाहन पळवून आणलेल्या आणि बळजबरीने वेश्याव्यवसाय करायला लावण्यात आलेल्या महिलांसाठी ती विशेषत्वाने काम करते. आपल्या कामावर ती समाधानी आहे. परंतु तिला यापुढे जाऊनही काही करायचे आहे. त्याचा निर्णय तिने घेतला आहे. नागपुरातच आईच्या मदतीने स्वत:चा एनजीओ सुरू करून लहान मुलांसाठी काम करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
प्रेरणाची ही आगळीवेगळी वाट खऱ्या अर्थाने इतरांसाठीही प्रेरणादायी अशीच आहे.
हिंसक होत चाललेल्या तरुणांसाठी कार्यक्रम
सध्या लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार वाढले आहे. तरुण मुलं अतिशय हिंसक झाले आहेत. प्रेमात एखाद्या मुलीने नकार दिला तर मुलं तिच्यावर हल्ला करतात किंवा आत्महत्या करतात. हे प्रकार देशातच नव्हे तर विदेशातही पाहायला मिळतात. हे नेमके का होत आहे. यासाठी मुलांना शालेय स्तरपासूनच मार्गदर्शनाची गरज आहे. मुलांच्या शारीरिक बदलांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक वागणूक यावरही त्याला मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. त्याचे वागण्याने समाजात काय फरक पडेल, हे त्याला समजले तर तो काही करण्यापूर्वी विचार करेल. हा विचार झाला तर अशा घटना रोखता येऊ शकतात. यासाठी प्रेरणाने ‘बॉडी लिटरसी प्रोग्रॅम तयार केला आहे’. हा कार्यक्रम नागपुरातील मनपा शाळेच्या मुलांपासून सुरु करण्याची तिची योजना आहे. त्या दिशेने ती कामालाही लागली आहे.