जगातील तरुण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित
By admin | Published: October 21, 2015 03:21 AM2015-10-21T03:21:14+5:302015-10-21T03:21:14+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता सातासमुद्रापलिकडे पोहोचले आहेत.
जपानचा अकिरो करतोय भारतीय इतिहासाचा अभ्यास
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता सातासमुद्रापलिकडे पोहोचले आहेत. जगातील तरुणांनाही बाबासाहेबांनी भुरळ घातली आहे. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी जगातील तरुणांचा ओढा भारताकडे वाढला आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जपान येथील अकिरो नाकामुरा होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन जपान येथील काही विद्यार्थी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यात अकिरोचाही समावेश आहे. बिहार येथील नालंदा विद्यापीठात त्यांनी भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विज्ञान या विषयात ते एमए करीत आहेत.
विशेष म्हणजे अकिरोसह १५ विद्यार्थी बुद्धकालीन भारत समजून घेण्यासाठी सध्या नागपुरात आले आहेत. ते मनसर येथील बुद्धकालीन अवशेषांचा अभ्यास करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. अकिरो हा भदंत ससाई यांच्यासोबतच राहत आहे. दीक्षाभूमीवर दर्शनासाठी तो आला असता त्याच्याशी भेट झाली तेव्हा त्याने याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, भारत हा तथागत गौतम बुद्धांचा देश असल्याने भारताबद्दल आम्हाला नेहमीच आदर राहिला आहे. भारतातील प्राचीन इतिहास हा बुद्धाचाच आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला. यावरच मला पुढे पीएचडी करायची आहे. तथागत गौतम बुद्धांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुद्धा जपानमधील लोक सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
तथागत गौतम बुद्धांचे खरे तत्त्वज्ञान समजून घ्यायचे असेल तर ते डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीनेच समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचाही अभ्यास करीत आहोत. सध्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची तयारी सुरूअसल्याने या संपूर्ण सोहळ्यामुळे मी पार भारावून गेलो असल्याचेही अकिरो याने सांगितले. (प्रतिनिधी)