महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही
By कमलेश वानखेडे | Published: May 19, 2023 06:24 PM2023-05-19T18:24:20+5:302023-05-19T18:24:44+5:30
Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.
कमलेश वानखेडे
नागपूर : ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो ते खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. दुसरीकडे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनवर ईडीची चौकसी सुरू असून ते जेल की स्वातंत्र्य निवडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्य निवडले तर राष्ट्रवादी कमजोर होईल. दुसरीकडे शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांना गट म्हणून लढता येईल. पण ते पक्ष नोंदणी करायला गेले तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचा व्हीप चालेल, असे जे मान्य केले आहे त्यात नुकसान होईल. शेवटी शिवसेनेला नवे चिन्ह घेऊन लढावे लागेल. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. एकूणच एकीत बिघाडी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.
सीमावर्ती भागात बीआरएसला प्रतिसाद
- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. सीमावर्ती भागात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पुढे इतर भागात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल. मात्र, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला बीआरएसमुळे नुकसान होईल, असा दावा आंबेडकर यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षानेही राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याही प्रभाव वाढत आहे. एकूणच नवनवे राजकीय पर्याय समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावर खुलासा करावा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. युनोमध्ये काही बैठक असेल तर त्यासाठी अमेरिकेची परवानगी मागण्याची गरज पडत नाही. युनोत जुलैमध्ये कुठलिही बैठक नाही. मग अमेरिककेकडून काही निमंत्रण आले आहे का ? भारताकडे असलेल्या ‘कॉल मनी’ मध्ये मोठा वाटा अमेरिकेचा आहे. तो अमेरिका काढून घेत आहे का व या संदर्भात पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आहे का, याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. जुलैनंतर ‘कॉल मनी’ विड्रॉल होण्यास सुरुवात झाली तर मात्र देशात महागाई वाढेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.