अग्निऐवजी झाडाला साक्षी मानत झाली त्यांची सप्तपदी
By admin | Published: June 26, 2017 05:56 PM2017-06-26T17:56:44+5:302017-06-26T17:56:44+5:30
वर्धेत एका नवदाम्पत्याने अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून सप्तपदी केली.
रूपेश खैरी।
वर्धा : विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. ही सप्तपदी कायम राखत वर्धेत एका नवदाम्पत्याने अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून सप्तपदी केली. वृक्षतोड करून आग प्रज्वलित करण्याऐवजी या दाम्पत्याने एका रोपट्याची पूजा केली. सप्तपदीनंतर वर्धेतील हनुमान टेकडी गाठत या रोपट्याचे रोपण करून निसर्गसंवर्धनाचा संदेश देत आपल्या संसाराची मुहर्तमेढ रोवली.
वर्धा येथील भास्कर कोहळे यांची कन्या निकिता आणि पनवेल येथील दिनकर इंगोले यांचे चिरंजीव भूषण या दोघांचा रविवारी वर्धेत विवाह झाला. त्यांचा विवाह निसर्गसंवर्धनाची साक्ष देणारा ठरला. भूषण यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते मुंबई येथे फिल्म एडीटींगचे काम करतात तर वधू निकिता ही येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दोघेही उच्च शिक्षित असल्याने त्यांनी दिवसेंदिवस समाजात विवाह समारंभात होत असलेल्या कर्मकांडांना फाटा देण्याचा निर्णय घेत सप्तपदीऐवजी वृक्षपदी करण्याचा निर्णय घेतला.
विवाह मंडपात इतर सोपस्कार पार पाडल्यानंतर कुटुंबियांच्यावतीने सप्तपदीचा विधी सुरू झाला. यावेळी होम पेटविण्याऐवजी त्यांनी एका रोपट्याची पूजा करून विधी सुरू केला. या हिरव्या रोपट्याला सप्तपदीच्या सात प्रदक्षिणा मारून विधी आटोपल्यानंतर या रोपट्याचे रोपण करण्याचे ठरले. या वृक्षारोपणाकरिता या दाम्पत्याने त्यांच्या परिवारासह हनुमान टेकडी गाठली. येथे वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने वृक्षारोपणाकरिता तयार केलेल्या खड्ड्यात रोपटे लावण्यात आले. यावेळी वधू व वर पक्षातील नागरिकांसह अनेकांची उपस्थिती होती.