वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:49 PM2018-09-19T22:49:30+5:302018-09-19T22:52:28+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी बुधवारी विदर्भ वन्यजीव रक्षक संघटनेच्यावतीने उपराजधानीत आंदोलन केले. महाराज बाग येथून रॅली काढून वन्यजीव रक्षकांनी आपला आवाज बुलंद केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी बुधवारी विदर्भ वन्यजीव रक्षक संघटनेच्यावतीने उपराजधानीत आंदोलन केले. महाराज बाग येथून रॅली काढून वन्यजीव रक्षकांनी आपला आवाज बुलंद केला.
वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, शार्प शूटर शाफत अली यास परत पाठवावे, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या. यावेळी महाराज बाग येथून संविधान चौकापर्यंत रॅली काढून ‘शाफत अली वापस जाओ’च्या घोषणा दिल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाघाची वेशभूषा करून आंदोलनात सहभाग नोंदविला. वनविभागाने यापूवीर्ही बोर व्याघ्रप्रकल्पात सोडलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवाब अली याला पाचारण केले होते. आताही नवाबलाच बोलविण्यात आले. वन विभागाकडे यंत्रणा असूनही खाजगी शूटर नवाबला का बोलविण्यात येते, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला. वनविभागाने अनेक सहायक वनसंरक्षक, विभागीय वनाधिकाऱ्यांना वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. राज्यात प्रशिक्षित अधिकारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांची चमू असताना खाजगी शूटरला वनविभागाने परत पाठविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी संविधान चौकात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व) सुनील लिमये यांनी वनविभागाच्यावतीने निवेदन स्वीकारून वनजीवप्रेमींच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी वन विभागाला थोडा वेळ द्या, आम्ही तुमचे म्हणणे वनमंत्र्यांपर्यंत पोहोचवितो, असे त्यांनी यावेळी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. यावेळी पराग दांडगे, आकाश विहिरे, माधव वैद्य, राज इरने, अनुप येरणे, रत्नदीप वानखेडे, नीलेश मेश्राम, राहुल कोठेकर, श्रीराम रसाळ, जेरील बानाईत यांच्यासह विदर्भातील विविध संघटनांचे वन्यजीव रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.