इनडोअर स्टेडियमचे काम गतीने करण्याचे निर्देश
By आनंद डेकाटे | Updated: May 24, 2024 15:34 IST2024-05-24T15:34:09+5:302024-05-24T15:34:36+5:30
Nagpur : कुलगुरूंनी घेतला बांधकामाचा आढावा

Instructions for speeding up indoor stadium work
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रवि नगरस्थित क्रीडा संकुलात मल्टीस्टोरी मल्टीपरपज इनडोअर स्टेडियमच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी नुकतीच विद्यापीठाच्या क्रीडा परिसराला भेट देत इनडोअर स्टेडियमचे बांधकाम गतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडियम प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ४४.४४ कोटी रुपये मंजूर केलेल आहेत. यापैकी रुपये २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता विद्यापीठात प्राप्त होऊन तो सार्वजनिक विभागास हस्तांतरित करण्यात आला आहे. विद्यापीठाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा या दृष्टिकोनातून इनडोअर स्टेडियमची इमारत तयार होत असतानाच स्टेडियममध्ये होऊ घातलेल्या खेळ प्रकारांसाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्याची सूची तयार करून निवड करणे आदी प्रशासकीय मान्यता घेणेस्तव प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात येण्यासाठी असणारे मुख्य प्रवेशद्वार हे मोठे आणि भव्य असावे. अद्यावत प्रकाश योजनेमुळे दिवस-रात्र (डे नाईट) सामने या ठिकाणी घेता येणार आहेत. स्टेडियम मधील प्रकाश योजनेची सविस्तर माहिती घेणे करता एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाची सूचनाही कुलगुरूनी केली.
यावेळी आंतर विद्याशाखिय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, डॉ. धनंजय वेळूकर आणि द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार्थी विजय मुनीश्वर यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुशे, उपअभियंता अतुल गोटे, सहाय्यक अभियंता मोना नंदेश्वर, विद्यापीठ अभियंता नितीन विश्वकार, प्रकल्पाचे आर्किटेक आनंद सारडा, विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित होते.
इनडोअर स्टेडियम तीन मजली
तीन मजली असणाऱ्या या इनडोअर स्टेडियम मध्ये बास्केटबॉल, हँण्डबॉल, जिम्नास्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, कुस्ती आणि ज्युडो आणि अशा दहा खेळांची मैदानी राहणार आहेत. तळमजल्यावर बास्केटबॉल आणि पहिल्या माळ्यावर हँडबॉल अशी दोन खेळांची स्वतंत्र बंदिस्त मैदाने असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील एकमेव विद्यापीठ ठरणार आहे.