मेडिट्रिना हॉस्पिटलची चौकशी करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:05 AM2020-12-07T04:05:27+5:302020-12-07T04:05:27+5:30
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गैरप्रकार केल्याचा आरोप : दोन सदस्यीय समिती गठित लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाच्या महात्मा ...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गैरप्रकार केल्याचा आरोप : दोन सदस्यीय समिती गठित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बोगस रुग्णांवर उपचार केल्याचे दर्शवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलची चौकशी करण्याचे निर्देश महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिले आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर उपचार केले जातात. या योजनेंतर्गत मेडिट्रिना हॉस्पिटलने बोगस लाभार्थी दर्शवून सुमारे दोन कोटींनी शासनाची फसवणूक केल्यासंदर्भात आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला हाेता. या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार वेळीच चौकशी केली असती तर कोविड रुग्णांची फसवणूक झाली नसती. शासनाच्या योजनेत गरजूंना लाभ न देता बोगस लाभार्थी दर्शवून शासनाची फसवणूक टळली असती, अशी चर्चा आहे.
दरम्यान कोविड रुग्णांकडूनही या हॉस्पिटलने जादा रक्कम वसूल केल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल घेत नर्सिंग होम अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ५ अन्वये हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिले आहे. यासाठी दोन डॉक्टरांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीत हॉस्पिटलमध्ये अनियमितता आढळल्यास हॉस्पिटलचा परवाना रद्द होण्याची शक्यता असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.