वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’
By सुमेध वाघमार | Published: April 10, 2023 07:13 PM2023-04-10T19:13:38+5:302023-04-10T19:16:27+5:30
Nagpur News शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले.
सुमेध वाघमारे
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सुद्धा संभाव्य धोका टाळण्यासाठी मनपा रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
नागपूर शहर व ग्रामीणमध्ये मागील १० दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या ३८१वर पोहचली आहे. सध्या ३३२ कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यातील ३१६ रुग्ण गृहविलगीकरणात तर १६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. कोरोनाच्या संसगार्चा धोका लक्षात घेऊन राधाकृष्णन बी. यांच्या निदेर्शानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सोमवारी मनपाच्या विविध रुग्णालयांना भेट देउन वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आसोलेशन रुग्णालयाची पाहणी केली. येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आॅक्सिजन आणि खाटांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते. जोशी यांनी आरोग्य विभागाला आॅक्सिजन पाईप लाईनची तपासणी करणे, स्वच्छता राखणे आणि कोव्हिड रुग्णाला भरती करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.