उपराजधानीत कार्डधारकांना होतोय अपुरा धान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:21 PM2020-04-06T13:21:41+5:302020-04-06T13:22:04+5:30
सरकारने तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली. परंतु नंतर निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून दिले. मात्र कार्डधारकांना १ महिन्याचे पर्याप्त धान्य सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली. परंतु नंतर निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून दिले. मात्र कार्डधारकांना १ महिन्याचे पर्याप्त धान्य सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे. कार्डधारकांना धान्याची पावती दिली जात नाही. धान्य कमी असल्याचा हवाला देत कमीच धान्य दिले जात आहे. जिल्हाधिकारी ग्राहक कल्याण समितीने सुद्धा यासंदर्भातील तक्रारी येत असल्याचा खुलासा केला आहे. नागरिकांकडून रेशन दुकानातून धान्याची काळाबाजारी केली जात असल्याची ओरड होत आहे.
ग्राहक कल्याण समितीला अनेक लोकांनी रेशन केंद्रावरील काळाबाजारी होत असल्याचे व्हिडिओ पाठविले आहे. कार्डधारकांना पावती देणे अनिवार्य असताना पावती दिली जात नाही. स्टॉक कमी असल्याचे सांगून कमीच धान्य दिले जात आहे. पावती न देता धान्य वितरणात गडबड करून काळाबाजारी केली जात आहे. टेका नाका येथील एका रेशन केंद्रावर एका महिला कार्डधारकाला ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्यात आला. त्यांना पावती सुद्धा दिली नाही. जेव्हा दुकानदाराकडून पावती मागण्यात आली तेव्हा त्यात २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ व १ किलो डाळ वितरित केल्याचे निदर्शनास आले. त्या महिलेने सांगितले की, त्यांना दर महिन्याला एवढेच धान्य दिले जाते. यासंदर्भात अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.