मधुमेहावर पं.दीनदयाल अभियानाचे इन्सुलीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:00 AM2017-09-19T00:00:16+5:302017-09-19T00:00:43+5:30
पेट्रोलने जनसामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा सोसणारा मनुष्य मधुमेहाने (ब्लड शुगर) त्रस्त आहे.
जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलने जनसामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा सोसणारा मनुष्य मधुमेहाने (ब्लड शुगर) त्रस्त आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारने राज्यात ‘पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियान’ राबविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या टप्यात सहा जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
मधुमेह रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील जनतेस मधुमेहाची कारणे आणि लक्षणे यांच्या अभ्यासासहित विविध अवस्थांचे निदान करून आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीचे महत्त्व या अभियानातून पटवून दिले जाणार आहे.
राज्यात २ ते १० आॅक्टोबर दरम्यान धुळे, रायगड, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि अकोला या सहा जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येईल. यात मधुमेहाची शंका असलेल्या रुग्णांची तपासणी आणि रक्ताचे नमुने घेतले जाईल. या अभियानात वरील सहा जिल्ह्यातील प्रत्येक आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी महाविद्यालयात मधुमेह तपासणी कक्ष स्थापन करण्यात येतील.
अधिकाधिक नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यामार्फत जिल्हास्तरावर जनजागृती अभियान राबविण्यात येईल. शहरी भागात आरोग्य केंद्रात मधुमेह तपासणी कक्ष स्थापन करण्यात येतील.
नियोजनासाठी तीन समित्या
‘पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियाना’चे नियोजन करण्यासाठी तीन समित्या असतील. यात राज्यस्तरावरील समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील. यात एकूण १२ सदस्य राहतील. जिल्हास्तरावर पालकमंत्री समितीचे मुख्य समन्वयक आणि अध्यक्ष राहतील. यात १४ सदस्य राहतील. तालुकास्तरावर नगराध्यक्षांच्या अध्यक्षेत
सात सदस्यीय टीम या अभियानाची अंमलबजावणी करेल. राज्य ते तालुकास्तरावरील समित्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.