भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:11 PM2019-04-30T22:11:07+5:302019-04-30T22:11:47+5:30

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Integrated Organizations for the Protection of Bharatwan: Human Chain on Wednesday | भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

Next
ठळक मुद्देवनराईने दर्शविला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वनपरिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वनपरिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी या प्रस्तावाबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष १०० ते १५० वर्षे जुने आहेत. या पुरातन झाडांसह लहानमोठी १५०० च्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. प्रस्तावाच्या एका निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तलावाचा प्रश्न विचारात घेतल्यास सौंदर्यीकरणाऐवजी तलावाची खोली वाढविणे, तलाव स्वच्छ करणे, बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे मत त्यांनी मांडले. १ मे रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या मानव शृंखला आंदोलनात लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेत वनराईचे अजय पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबा देशपांडे, सचिव नीलेश खांडेकर उपस्थित होते.
नव्या रस्त्याची गरज काय?
यावेळी माहिती देताना वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी सांगितले की, तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हील लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळला नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वनपरिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Integrated Organizations for the Protection of Bharatwan: Human Chain on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.