मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:04 AM2022-12-27T06:04:34+5:302022-12-27T06:05:37+5:30
भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात येते.
यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. त्यामुळे संघभूमीत येत असताना संघ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा होती. यंदा संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन होणार की नाही, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम होता. परंतु २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या वर्गाचे आयोजन संघाकडून करण्यात आले आहे. शिंदे गटातील आमदार यावेळी राहणार का याबाबत निश्चितता नाही.
मार्गदर्शन कोण करणार याबाबत गुप्तता
या उद्बोधन वर्गात संघाकडून नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी हा वर्ग घेतील की स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोरच मंत्री-आमदार उपस्थित राहतील याबाबतीत संघाकडून मौन साधण्यात आले आहे.
संघ विचार आणि अपेक्षांवर राहणार भर
भाजपच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. शिवाय विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरेदेखील ओढण्यात येत आहेत. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.
भाजप आमदारांना ‘बौद्धिक’ अनिवार्य
यासंदर्भात पक्ष प्रतोदांनी नोटीस जारी केली आहे. भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही वर्षांअगोदर स्मृती मंदिर परिसरात न गेलेल्या सदस्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. भाजपने यासंदर्भात आदेश काढले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"