गुप्तचर आणि एटीएसकडून इरफान चाचू, कोडापेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:11 AM2019-03-19T01:11:11+5:302019-03-19T01:12:13+5:30
अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बराच वेळ विसंगत माहिती देऊन टाइमपास केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजमेरजवळून अटक करून आणलेल्या कुख्यात इरफान चाचू आणि नरेंद्र कोडापे यांच्यासह अन्य आरोपींचे नक्षल कनेक्शन तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी दिवसभर चौकशी केली. दरम्यान, या आरोपींनी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे बराच वेळ विसंगत माहिती देऊन टाइमपास केल्याची माहिती आहे.
कुख्यात मोहम्मद इरफान चाचू ऊर्फ शमी सिद्दीकी (वय ३८ ,रा. राजाराम ले-आऊट,जाफरनगर) आणि नरेंद्र मधुकर कोडापे (वय ३०, रा. शिवाजी वॉर्ड, वडसा), शेख इलियास ऊर्फ इल्लू शेख उमर (वय ३४ ,रा. गंजीपेठ), जफर खान ऊर्फ बग्गा
कदीर ऊर्फ जहीर खान (वय ३०, रा. बंगाली पंजा), शहबाज शेख मुबारक (वय २९,
रा. गंजीपेठ) यांच्यासह एकूण १७ जणांना पाचपावली पोलिसांनी अजमेर(राजस्थान)जवळ शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी नागपुरात आणल्यानंतर नमूद आरोपींना अटक केली तर इतरांना सूचना देऊन सोडून दिले. इरफान चाचूचे सिमी कनेक्शन आणि कोडापेचे नक्षल कनेक्शन पोलिसांच्या आधीपासून रेकॉर्डवर असल्याने रविवारी दिवसभर त्यांच्या गुन्हे अभिलेखाची पाहणी केली. दरम्यान इरफान याच्याविरुद्ध मानकापूर, सावनेर व गिट्टीखदानमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. गिट्टीखदानमधील प्राणघातक हल्ला प्रकरणात चाचू याच्यासह नौशाद याच्याविरुद्ध मोक्काचीही कारवाई करण्यात आली होती. कोडापे याच्याविरुद्ध उमरेड अड्याळ व नागभीडमध्ये शस्त्रप्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात.
इरफान व कोडापे या दोघांचे नक्षल कनेक्शन यापूवीर्ही उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमवारी आयबी व एटीएसच्या अधिकाऱ्यांनी
पाचपावली पोलीस ठाण्यात या दोघांची दिवसभर कसून चौकशी केली. माओवाद्यांबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून काय पुढे आले, ते उशिरा रात्रीपर्यंत कळू शकले नाही. आरोपी सारखे टाळाटाळ करीत होते, अशी सूत्रांची माहिती आहे.