बदली पाहिजे तर राजीनामा द्या अन दुसऱ्या जिल्ह्याची परीक्षा पास करा; जिप शिक्षकांमध्ये संतापाची लाट
By निशांत वानखेडे | Published: June 26, 2023 03:47 PM2023-06-26T15:47:35+5:302023-06-26T15:50:51+5:30
आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदल्या बंद
नागपूर : जिल्हापरिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच घेतला. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी परीक्षा द्यावी लागेल. शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रभर शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
२१ जून २०२३ रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने बदलीबाबतचे परिपत्रक काढले आहे. यानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी केवळ तक्रारी बदल्या, पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या व आपसी बदल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. शिक्षक सहकार संघटनेचे राज्यध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी शिक्षण विभागाचा हा तुघलकी निर्णय असल्याचा आरोप केला आहे.
पिट्टलवाड यांनी सांगितले, शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन केली होती. या क्रांतिकारी निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या तर सुरळीत झाल्या, शिवाय लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबला. त्यापूर्वी बदल्या करण्यासाठी शिक्षक लाखो रुपये खर्च करीत होते. मात्र हा चांगला निर्णय रद्द करून पुन्हा शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे कुरण तयार करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना नवा निर्णय लागू केल्याचा आरोप पिट्टलवाड यांनी लोकमतशी बोलताना केला.
निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम
या निर्णयाविरोधात शिक्षक सहकार संघटनेतर्फे डिजिटल स्वाक्षरी अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. संघटनेच्यावतीने रवी तिजारे, प्रमोद डोंगरे, रवी आंबुले, निलेश दशमुख, दिपक परचंडे, रवि अंबुले, रवि ढगे, गजानन देवकत्ते, अनिल बसुळे, मनोज बनकर, मनोज कोरडे आदींचा अभियानात सहभाग आहे.
तर शिक्षक स्वत:च तक्रारी करायला लावतील
नवीन धोरणात शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरण आणि तक्रारी बदल्यांना प्राधान्य देण्यात येईल. यामुळे शिक्षक स्वत:च ग्रामस्थांना तक्रारी करायला लावतील आणि अधिकाऱ्यांना पैसा देवून हव्या त्या जिल्ह्यात बदली करून घेतील, अशी शक्यता पिट्टलवाड यांनी व्यक्त केली. यामुळे भ्रष्टाचाराला पुन्हा खतपाणी घातले जाईल.