नागपुरात कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळी गवसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 11:28 PM2018-01-04T23:28:19+5:302018-01-04T23:34:51+5:30
वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. व्यंकटेश बाबू नायडू (वय ३८, रा. जाविदनगर, सिगोमा, कर्नाटक), अलमेलू रमेश ऊर्फ शिवा शेट्टी (वय २७, रा. कोयंपनगर, सिगोमा, कर्नाटक) आणि लक्ष्मी ऊर्फ मारी मुतब्बा शेट्टी (वय २७, रा. कोयंपनगर, सिगोमा कर्नाटक), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील नायडू डम्पिंग यार्ड, सूरजनगर (नंदनवन) तर शेट्टी पारडी (कळमना) भागात भाड्याच्या खोलीत राहायचे.
कारमधील बॅगवर नजर जाताच ती अवघ्या काही क्षणात उडविण्यात ही टोळी सराईत आहे. दिवस-रात्र या टोळीचे सदस्य विविध भागात फिरत असतात. कधी वाहनाची चाकं पंक्र करून, कधी घाण टाकून तर कधी वाहनाखाली आॅईल टाकून ही टोळी कारमधील रोख किंवा मौल्यवान चीजवस्तू असलेली बॅग लंपास करते. फाटक्या नोटा बदलवून देणाºया गणेशपेठ कॉटन मार्केट चौकातील एका आरोपीची साडेतीन लाखांची बॅग ३० डिसेंबर २०१७ च्या रात्री आरोपींनी अशाच प्रकारे लंपास केली होती. त्याचा तपास करताना पोलिसांना या टोळीतील सदस्य डम्पिंग यार्डजवळ भाड्याने राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी या भागातील एका घरी धडक देऊन आधी नायडूला आणि त्याने दिलेल्या माहितीवरून नंतर पारडीतील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी पंक्चर करण्यासाठी वापरला जाणारा टोचा, आॅईल, ४६,५९० रुपये, दीपक शर्मा नामक व्यक्तीचे आधारकार्ड, बँक आॅफ महाराष्ट्रचे पावती बुक आणि स्पोर्टस् बॅग जप्त केली. टोळीचा म्होरक्या आपल्या तीन साथीदारांसह पसार होण्यात मात्र यशस्वी ठरला. पकडलेल्या आरोपींनी गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत ३० डिसेंबर २०१७ च्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय जून ते डिसेंबर महिन्यात लकडगंज भागात केलेल्या अन्य तीन गुन्ह्यांचीही कबुली दिली.
चोरीची रोकड बँकेत?
आरोपींकडे बँकेचे पावती बुक आढळले. त्यामुळे चोरी केलेली रक्कम आरोपी बँकेत जमा करून सुरक्षित करीत असावेत, असा संशय आहे. ज्यांच्याकडून आरोपींनी भाड्याने खोल्या घेतल्या त्यांना ते आम्ही कपडे विकतो, असे सांगायचे. कपड्याचा गठ्ठा घेऊन ते सकाळीच घराबाहेर पडायचे. त्यामुळे घरमालक अथवा परिसरातील नागरिकांना त्यांचा संशय येत नव्हता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा छडा लावण्यात अखेर यश मिळवलेच.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक ३ चे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, प्रभाकर शिवरकर, उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेष ठवरे, सुरेश हिंगणेकर, अनिल दुबे, मनीष भोसले, अतुल दवंडे, श्याम कडू तसेच फिरोज सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.