बोगस बियाण्यांची आंतरराज्यीय तस्करी : जिल्ह्याचे सीमावर्ती गावे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 08:01 PM2019-06-17T20:01:56+5:302019-06-17T20:03:06+5:30
खरीप हंगाम तोंडावर येताच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट वाढतो. कमी किमतीत आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे असल्याने शेतकरी त्याला बळी पडतात. कृषी विभागातर्फे बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्तही केले आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचे काही धाडीतून सिद्ध झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगाम तोंडावर येताच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट वाढतो. कमी किमतीत आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे असल्याने शेतकरी त्याला बळी पडतात. कृषी विभागातर्फे बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्तही केले आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचे काही धाडीतून सिद्ध झाले आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत़ जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करून आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांना पुरविल्या जातो आहे. या रॅकेटमधील सूत्रधाराची काम करण्याची पद्धतीसुद्धा अफलातून आहे़ आपल्या मूळ ठिकाणाहून बियाणे बोलवायचे झाल्यास रेल्वे, कुरिअरने किंवा ट्रॅव्हल्सने हा माल शहराच्या वेशीवर दाखल होतो. तसेच काही कृषी केंद्र संचालकांना गाठून अवास्तव कमिशनचे आमिष देऊन त्यांना विक्रीचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात येते़ कुही तालुक्यातील आंभोरा, पचखेडी, मांढळ, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि नागपुरातील मौदा, रामटेकच्या आदिवासीबहुल भाग आणि मध्य प्रदेशची सीमा असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा, केळवद भागातही या बोगस बियाणे विक्रीचे प्रकार वाढले आहे़ या प्रकाराला स्वत: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर भागात तर अख्खी गावेच्या गावे बोगस बियाण्यांच्या पॅकेजिंगचे कामे करतात व विक्रीसाठी त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते़ नागपुरातील एजंटाशी संपर्क साधून हे बियाणे विक्रीला पाठविले जाते़ दुसरीकडे शेतकऱ्यांनी ब्रॅण्डेड बियाणेच खरेदी करावेत़ बाजारात कमी किमतीत आणि आकर्षक वेष्टनाला बळी पडून शेतकऱ्यांनी फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़
यंत्रणा अपुरी
बोगस बियाण्यांची विक्री दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. कारण त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अपुरी आहे. कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन केले जाते. पण त्यातही कर्मचाऱ्यांची मर्यादा असते. तपासासाठी वाहने नाहीत. पोलीससारख्या यंत्रणेचे सहकार्य नाही. कृषी केंद्राच्या संचालकांना मिळणाऱ्या कमिशनमुळे, धाडी टाकूनही सोर्स उघडे करीत नाही. त्यामुळे दरवर्षी बोगस बियाण्यांची खरेदी करून शेतकरी फसविले जात आहे.