पालक आणि मुलांमधील सुसंवादच महत्त्वाचा
By admin | Published: December 31, 2014 01:06 AM2014-12-31T01:06:28+5:302014-12-31T01:06:28+5:30
हल्ली प्रेम म्हणजे काय, तेच नेमकेपणाने कळत नाही. प्रेमाची परिभाषाच बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आणि भावनांची सूक्ष्मता, संवेदनांचा टोकदारपणा जरासा हरविला.
विविध मान्यवर तज्ज्ञांची मते : ‘हो आहे माझा बॉयफ्रेंड’ एक अनोखा कार्यक्रम
नागपूर : हल्ली प्रेम म्हणजे काय, तेच नेमकेपणाने कळत नाही. प्रेमाची परिभाषाच बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आणि भावनांची सूक्ष्मता, संवेदनांचा टोकदारपणा जरासा हरविला. ‘युज अँड थ्रो’ या संकल्पनेसारखे प्रेम कधीच असू शकत नाही. आकर्षण, प्रेम आणि समर्पण या तीन वेगळ्या बाबी आहेत पण त्याच्या सीमारेषाही पुसट आहेत. उमलत्या वयात त्या कळू शकत नाही. यासाठी चांगले काय आणि वाईट काय, याचा सद्सद्विवेक असायला हवा. तो पालक आणि मुलांमधल्या सुसंवादातूनच शक्य आहे, असा सूर सर्वच मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केला.
मुलामुलींचे बायफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हल्ली नियमच झाला आहे. यातून मुलांना कसे सावरायचे आणि संस्कारित करायचे, हा प्रश्न प्रत्येकच पालकांचा आहे. नव्या पिढीच्या वर्तनाचा आणि निकोप नातेसंबंधांचा प्रश्न चर्चेला घेणारा हा कार्यक्रम विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने साई सभागृहात आयोजित करण्यात आला. यात मानसशास्त्रज्ञ राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ डॉ़ शैलेश पानगावकर, लैंगिक उपचारतज्ज्ञ डॉ़ संजय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, शैलेश पांडे, प्रगती पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ऋचा धाक्रस, प्रतिक गायकवाड, गौरव अंबारे, काजल काटे, समीर तभाने, श्रीरंग यांनी चर्चेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. तत्पूर्वी ‘हो आहे माझा बॉयफ्रेण्ड’ ही धनंजय मांडवकर लिखित व संदीप दाबेराव दिग्दर्शित लघुनाटिका सादर करण्यात आली़ कार्यक्रमाचे समन्वयन व निवेदन मनिषा साधू यांनी केले़
याप्रसंगी शैलेश पांडे म्हणाले, प्रतिष्ठा आणि सामाजिक नियमांच्या चौकटीमुळे पालकांचा मुलांशी संवाद होत नाही. संवाद तुटला की, चांगल्या-वाईटाचा फरक कळत नाही आणि पाऊल वाकडे पडते. ज्यांच्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बदलत राहतात त्यांना प्रेम कळतच नाही, तो केवळ टाइमपासच असतो. बाळ कुळकर्णी म्हणाले, प्रेमाच्या नावावर सावळा गोंधळ सुरू आहे. प्रेम जीवघेणे नव्हे जीवनदायी असते. जेथे भीती असते तेथे प्रीती नसते. प्रेमाला अनेक पदर असतात आणि त्यात विश्वास महत्त्वाचा धागा असतो. राजा आकाश आणि पानगावकर यांनी प्रत्येक नात्यात परस्पर संवादालाच महत्त्व असल्याचे सांगितले. संजय देशपांडे यांनी प्रत्येक स्थितीत मुलामुलींना विश्वासाने समजून घेणे अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. गिरीश गांधी यांनी मुलांसाठी कुटुंबच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)