फ्रान्सच्या सेफरॉनने दाखविली मिहानमध्ये रुची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:57 AM2019-08-19T11:57:16+5:302019-08-19T11:57:39+5:30
फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरामध्ये सुमारे एक हजार एकरात असलेल्या एव्हिएशन हबमध्ये आता नव्याने तीन कंपन्यानी जमीन खरेदी करण्यात रुची दाखविली आहे. जगातील एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी फ्रान्सची कंपनी सेफरॉनचा समावेश आहे. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती. ऑगस्टनंतर या कंपनीसोबत पुढील चर्चा केली जाणार आहे.
फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या शिवाय ही कंपनी एमआरओ (मेंटेनन्स, रिपेयर व ओव्हरहॉल) सेवासुद्धा उपलब्ध करते. मिहानच्या एव्हिएशन हबमध्ये त्यांनी ५० एकर जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.
सेफरॉन अनेक विमानांच्या इंजिनची निर्मिती करते. या कंपनीने उपराजधानीमध्ये काम सुरू केले तर २०० व्यक्तींना प्रत्यक्ष आणि ८०० व्यक्तींना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. सेफरॉन व्यतिरिक्त ट्रेनिंगसाठी फ्लाईट सिम्युलेटर उपलब्ध करणाऱ्या नागपूर बेस्ट कंपनी फ्लायपॅसिफिक फ्लाईट सिम्युलेशन्स प्रा.लि. आणि विमानांचे कंपोनेंट्स निर्माण करणारी फ्रान्सची कंपनी लेक्रॉइक्स यांचाही यात सहभाग आहे. या दोन्ही कंपन्यांनीही जमीन घेण्याची तयारी दशर््विली आहे.
मिहानच्या एव्हिएशन हबमध्ये आतापर्यंत आठ कंपन्यांनी ३०२.८१ एकर जमीन घेतली आहे. यात एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एमआरओ साठी) ६९ एकर, एएआर इंडामेर टेक्निक २९.३१ एकर, आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमि. आणि थेलेस रिलायन्स डिफेन्स सिस्टीम लिमि.) यांनी १२४ एकर जमीन खरेदी केली आहे.
ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेड सुद्धा ३० एकर जमीन घेऊन येथे कार्यरत आहे. इंडामेरची उभारणी अद्यापही सुरू आहे. या वर्षाअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो.