नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:58 PM2018-08-08T20:58:32+5:302018-08-08T20:59:17+5:30

नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Internal inquiry of Naxal supported Shoma Sen | नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी

नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाकडून विशेष समिती स्थापित : निवृत्तिलाभाची प्रक्रियाही थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा. शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा. सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा. सेन यांना निलंबित करण्यात आले.
या निलंबनानंतर विद्यापीठ वर्तुळात निरनिराळे मतप्रदर्शन झाले होते. डॉ. सेन यांच्या या कृत्यांसंदर्भात पोलिसांकडूनदेखील विद्यापीठाला सविस्तर पत्र पाठविण्यात आले. याच्या आधारावर विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशीसाठी अंतर्गत समिती गठित केली आहे. या समितीत कायदेशीर तज्ज्ञांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ.सेन यांच्याविरोधात चौकशी सुरू असून याचा अहवाल यायला साधारणत: काही महिने लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील इतरांची चौकशी होणार का?
डॉ.सेन यांच्यासह विद्यापीठातील आणखी काही जणांवर सुरक्षायंत्रणांची नजर होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ.सेन यांच्या विभागातील कार्यप्रणालीसोबतच विद्यापीठातील अशा व्यक्तींसंदर्भात चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Internal inquiry of Naxal supported Shoma Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.