नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:18 AM2018-11-14T01:18:50+5:302018-11-14T01:20:10+5:30
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाने चौकशी सुरू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शोमा सेन यांनी निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावे, यासंदर्भात विद्यापीठाकडे अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाने चौकशी सुरू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शोमा सेन यांनी निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावे, यासंदर्भात विद्यापीठाकडे अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्यात आले.
या निलंबनानंतर विद्यापीठ वर्तुळात निरनिराळे मतप्रदर्शन झाले होते. डॉ.सेन यांच्या या कृत्यांसंदर्भात पोलिसांकडूनदेखील विद्यापीठाला सविस्तर पत्र पाठविण्यात आले. याच्या आधारावर विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशीसाठी अंतर्गत समितीदेखील गठीत करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी केवळ सेन यांच्याविरोधात लावलेली कलमे व झालेली कारवाई याचीच माहिती दिली आहे. पोलिसांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय आरोपपत्रदेखील विद्यापीठाला मिळालेले नाही. अशा स्थितीत चौकशी समिती स्थापन करणे योग्य होणार नाही. पोलिसांकडून कागदोपत्री ठोस दस्तावेज मिळाल्यानंतर अंतर्गत चौकशीला सुरुवात होईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.
अद्याप ‘एनओसी’ दिलेली नाही
दरम्यान, ३१ जुलै रोजी प्रा.शोमा सेन या विद्यापीठातून निवृत्त झाल्या. त्यांंनी निवृत्तीनंतरचे लाभ मिळावे व निवृत्तीवेतन सुरू करण्यात यावे यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. मात्र विद्यापीठाने त्यांना अद्याप ‘एनओसी’ दिलेली नाही. हा अर्ज उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. शोमा सेन यांना निवृत्तीअगोदर निलंबित करण्यात आले होते. याची सविस्तर माहिती आम्ही सहसंचालकांना दिलेली आहे. आता तेच याबाबत निर्णय घेतील, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.