लॉकडाऊनला काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध; पालकमंत्र्यांनी चर्चाही केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:52 AM2021-03-16T10:52:54+5:302021-03-16T10:53:14+5:30
Nagpur News पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली. याला भाजपने उघड विरोध करीत राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता स्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी यात भर घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली. याला भाजपने उघड विरोध करीत राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता स्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी यात भर घातली आहे. नागपुरात लॉकडाऊन लावण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी विश्वासात घेणे तर दूरच, साधी चर्चाही केली नाही, अशी नाराजी काँग्रेसचे नागपुरातील आमदार, विधानसभा लढलेले उमेदवार व बहुतांश नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
पक्षांतर्गत फूट दिसून नये म्हणून काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी उघडपणे लॉकडाऊनच्या विरोेधात बोलणे टाळत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात, प्रभागात, वॉर्डात गरजू व रोजगार बुडालेल्या नागरिकांना सामोरे जावे लागत असल्यामुळे ते पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर नाखूश आहेत.
या कारणांमुळे आहे नाराजी
- लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसतो. तो काँग्रेसचा खरा मतदार आहे.
- गरीब, मजुरांसाठी धान्य, किराणा, भोजन किंवा आर्थिक मदतीची कुठलीही पर्यायी व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाही.
- आता हा वर्ग दोन दिवसांनी घर चालविण्यासाठी कामाच्या शोधात घराबाहेर पडेल व रोजगार न मिळाल्यास नेत्यांच्या घरासमोर गर्दी करेल.
- कामाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या या वर्गाला वाटेत पोलिसांचा सामना करावा लागेल.
- छोट्या व्यावसायिक, चहाटपरी, पानठेले, रेस्टॉरंट चालक यांची गाडी आता कुठे रुळावर येऊ लागली होती. त्यांनाही पुन्हा फटका बसणार आहे.
- महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. लॉकडाऊनमुळे धंदा बुडाल्याने तसेच रोजगार गमावल्यामुळे लोकांमध्ये रोष वाढला, तर याचे खापर विरोधकांकडून काँग्रेसवर फोडले जाण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे लॉकडाऊन करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता.
लॉकडाऊन वाढविल्यास उघड विरोधाची शक्यता
- लॉकडाऊन २१ मार्चपर्यंत आहेत. मात्र, तो आणखी वाढविण्यात आला, तर मात्र काँग्रेसमधून उघड होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन जसजसा वाढतो तसतसा नागरिकांना होणारा त्रास वाढतो व त्यामुळे लोकप्रितिनिधींचाही त्रास वाढतो. अशा परिस्थितीत गरज भासल्यास नियम कडक करावे, पण लॉकडाऊन नको, अशी उघड भूमिका घेण्याची तयारी काही काँग्रेसनेते व नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दर्शविली.
लसीकरणासाठी पुढाकार नाहीच
- लॉकडाऊनचा लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांना लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचविण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमत्र्यांनी केले आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे आढळले नाही. घराबाहेर पडण्यासाठी पालकमंत्र्यांनी पोलीस पासची व्यवस्था का केली नाही, अशी नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.