नागपुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:38 PM2020-07-11T21:38:14+5:302020-07-11T21:39:43+5:30
: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले.
बुधवारी रात्री ठाकूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. ज्या पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी लाच घेताना पकडला गेला, त्या ठाण्यातील ठाणेदाराची तातडीने बदली करण्यात यावी, असे आदेश दोन महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालकांनी काढले होते. त्यामुळे ठाकूरला लाच घेताना पकडल्यानंतर शहर पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वादळ येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यानुसार शुक्रवारी उशिरा रात्री अजनीचे ठाणेदार संतोष खांडेकर यांच्यासह शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले. नवीन आदेशानुसार खांडेकर यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर कपिलनगरचे ठाणेदार प्रदीप रायण्णावार यांना नियुक्त करण्यात आले. तर कपिलनगरचे ठाणेदार म्हणून गुन्हे शाखेचे मुख्तार शेख यांना नेमण्यात आले. कंट्रोल रूममधून काढून प्रभाकर मत्ते यांना वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली. तर, बापू ढेरे यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक सेलमध्ये नियुक्ती देण्यात आली.
अनेकांची निराशा, काहींना अभय
शहरातील काही पोलीस ठाण्यातील कारभार अंदाधुंद झाला आहे. काहीजण प्रीतीच्या गोतावळ्यात सापडले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांची बदली होईल आणि ठाणेदार म्हणून आपली वर्णी लागेल, असा काही वरिष्ठ निरीक्षकांचा अंदाज होता. त्यासाठी ते आस लावून बसले होते. मात्र त्यांना ठाणेदारकी देण्याऐवजी वाळीत पडलेल्या दोघांचे पुनर्वसन केले गेले. काहींना पुन्हा अभय मिळाल्याने ठाणेदारकीसाठी आस लावून बसलेल्या अनेकांची निराशा झाली आहे.