नागपुरात ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार
By आनंद डेकाटे | Published: September 10, 2022 06:12 PM2022-09-10T18:12:41+5:302022-09-10T18:37:44+5:30
देश-विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी येणार
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर येत्या ३ ऑक्टोबर रोजी नागपुरात सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देश -विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी सहभागी होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. गगन मलीक फाऊंडेशनचे अध्यक्ष गगन मलीक आणि माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी शनिवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
थायलंडच्या चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदंत फ्रा मेधीमज्जीरोदम यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. थायलंडचे डॉ. पाेंगसांक टंगकाना हे बीजभाषण करतील. या परिषदेत वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत पोर्नचाईपीन्यापोंगे, भदंत महा आर्यन, मास्टर मिचेल ली (जर्मनी), कॅप्टन नट्टाकिट, टिथीरड हेंगसाकुल,पटचारपीमोल, उषा खोराना, उट्टीचाई वाेरासिंग, मिथीला चौधरी (थायलंड), डॉ. थीम क्वांग (जर्मनी) यांच्यासह डॉ. सुखदेव थाेरात, भंते विमलकिर्ती गुणसिरी, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. रुपाताई बोधी, डॉ. विमल थोरात आदी मार्गदर्शन करतील.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेयरमन माजी खासदार विजय दर्डा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एड. सुलेखा कुंभारे, सिद्धार्थ हत्तीमारे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. पत्रपरिषदेला नितीन गजभिये, प्रा. वंदना इंगळे, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. नीरज बोधी, प्रकाश कुंभे आदी उपस्थित होते.