आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:02 PM2018-06-22T23:02:08+5:302018-06-22T23:04:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरु भदंत अनिल शाक्य यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरु भदंत अनिल शाक्य यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने बौद्ध अध्ययन केंद्राच्या नवनिर्मित वास्तुत आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या समारोपीय सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव व परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते. व्यासपीठावर आयोजन समितीचे डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. नीरज बोधी, डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते. भदंत अनिल शाक्य म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्म स्वीकाराने पवित्र झालेल्या नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या या परिषदेच्या रुपाने नवे शांततामय व परस्पर सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. नाग या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट असा होत असून नागपूर शहराने या परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा परिचय दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिषदेचे मुख्य संयोजक, कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी बौद्ध अध्ययन केंद्राशी देश-विदेशातील विद्यापीठातील बौद्ध अध्ययन केंद्रे व डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग जोडल्या जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्ध विचाराचे व आंबेडकर विचाराचे अध्ययन व संशोधन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसीय परिषदेतील सत्रात घडलेल्या चर्चेचा वृत्तांत डॉ. कृष्णा कांबळे यांनी मांडला. संचालन डॉ. केशव वाळके यांनी केले. आभार डॉ. विकास जांभुळकर यांनी मानले. परिषदेच्या समारोपापूर्वी आयोजित सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. यशदत्त अलोणे, डॉ. मालती साखरे, डॉ. सी. डी. नाईक यांनी भूषविले. विविध सत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. कृष्णा आनंद, डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत डॉ. ज्ञानादित्य शाक्य, डॉ. तलत परवीन, डॉ. मृदुल निळे, डॉ. हरीश वानखेडे यांनी आपले विचार मांडले. परिषदेला चीन, म्यानमार, थायलंड, जर्मनी येथील अभ्यासक, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विचारवंत, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.