विना परवानगीनेच पार पडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

By admin | Published: January 30, 2017 02:15 AM2017-01-30T02:15:15+5:302017-01-30T02:15:15+5:30

दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपुरात रविवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामन्याला

International cricket match without permission | विना परवानगीनेच पार पडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

विना परवानगीनेच पार पडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

Next

सुरक्षेच्या अनेक त्रुटी पोलिसांनी नाकारली होती परवानगी कारवाईचाही दिला होता इशारा
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपुरात रविवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामन्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सुरक्षेच्या संबंधाने आवश्यक बाबींची पूर्तता झाली नसल्यामुळे पोलिसांनी हा पवित्रा घेतला होता. विना परवानगीने होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने काही कमी-जास्त झाले तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांना दिला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर टी-२० चा सामना रविवारी रात्री पार पडला. दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या उपराजधानीत हा आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने पोलिसांवर सुरक्षेचे प्रचंड दडपण होते. दोन्ही संघातील खेळाडूंची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. हे खेळाडू नागपुरात येण्यापासून तो परत जाण्यापर्यंत सुरक्षेसंबंधी कुठलीही चूक होऊ नये, त्याचप्रमाणे जामठा स्टेडियमच्या आत-बाहेरच्या परिसरात घातपातासारखी घटना घडू नये, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. त्यानंतर सामना बघायला येणाऱ्या क्रिकेट रसिकांना कोणता धोका होऊ नये, वाहनांच्या तळांवर (पार्किंगस्थळी) काही अनुचित घडू नये, अपघात होऊ नये म्हणूनही पोलिसांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी जामठा स्टेडियम आणि
खेळाडूंच्या मुक्कामाच्या ठिकाणाची वेळोवेळी सुरक्षा व्यवस्था तपासत होते. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडतानाच व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांनाही सामन्याच्या अनुषंगाने सुरक्षेसंदर्भात काही सूचना केल्या होत्या. आवश्यक त्या यंत्रणांचे नाहरकत प्रमाणपत्र(एनओसी)देखील मागितले होते. मात्र, व्हीसीएने सुरक्षेचे अनेक मुद्दे वाऱ्यावर सोडले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३५ हजारांची असल्याचे प्रमाणपत्र (फायर सेफ्टी एनओसी) मिळाले असतानादेखील व्हीसीएने ४० ते ४५ हजार प्रेक्षक मैदानात बसविले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, इलेक्ट्रिसिटी, अग्निशमन विभाग, पार्किंग, व्हीसीएतर्फे नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांसोबत कामगार, कर्मचाऱ्यांचीही शहानिशा झाली नव्हती. या व अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण त्रुटी असल्यामुळे पोलिसांनी त्यासंबंधाने व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांकडे वारंवार त्याची पूर्तता करण्यासंबंधाने बोलणी, पत्रव्यवहार केला होता, मात्र शेवटपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. (प्रतिनिधी)

गंभीर चर्चा, मात्र बैठका निष्फळ
यासंबंधाने शनिवारी दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि व्हीसीएचे पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी एकमेकांना लेखी पत्रही दिले. सुरक्षासंदर्भाने रविवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात पुन्हा महत्त्वाची बैठक झाली. यावेळीसुद्धा व्हीसीएचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आवश्यक ती प्रमाणपत्रे अखेरपर्यंत न मिळाल्याने शेवटी पोलिसांनी सामन्याची परवानगी नाकारत असल्याचे पत्र व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांना दिले. सोबतच पोलीस परवानगीविना सामना घेतला आणि कमी-जास्त काही झाले तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही दिला. दोन्हीकडून फणफण झाल्याने ही बैठक संपली. त्यानंतर व्हीसीएचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी आपापल्या कामाला लागले. पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात आवश्यक तो तगडा बंदोबस्त लावला तर, व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी विनापरवानगीच सामना पार पाडला.
पोलीस कारवाई करतील काय?
या सामन्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दस्तुरखुद्द पोलीस अधिकाऱ्यांचेच मत आहे. त्याचमुळे त्यांनी सामन्याला परवानगी नाकारली. सामना संपल्यानंतरही (रात्री १०.३० नंतर) लाऊडस्पीकर, गोंगाट असे सर्व सुरू होते. त्यामुळे पोलीस आता व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतील काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात व्हीसीएचे मीडिया मॅनेजर पाध्ये यांच्याशी लोकमतने संपर्क केला असता, त्यांनी आपण सकाळच्या बैठकीत उपस्थित नव्हतो. त्यामुळे आपल्याला यासंदर्भात काही माहिती नसल्याचे सांगितले. दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगला होता, अशी पुष्टीही जोडली. तर, पोलिसांनी आजच्या सामन्याची परवानगी नाकारली होती आणि कमी-जास्त झाल्यास व्हीसीए पदाधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता, असे नाव न छापण्याच्या अटीवर तीन वेगवेगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: International cricket match without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.