जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीमुळे काही रोगांना मिळाले आदर्श निवासस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 10:11 AM2022-03-21T10:11:20+5:302022-03-21T10:18:54+5:30
केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : काेराेना विषाणूचा प्रकाेप सारे जग मागील दाेन वर्षांपासून अनुभवत आहे. हा आजार कसा आला, यावर संशाेधन सुरू आहे; पण चीनमधून प्रसारित झालेला हा विषाणू वटवाघूळ किंवा इतर वन्यप्राण्यांकडून माणसांमध्ये आल्याचे वैज्ञानिकांचे ठाम मत आहे. केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. जंगलताेडीमुळे अनेक आजारांना मानवी वस्तीमध्ये आदर्श निवासस्थान मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
वन क्षेत्र घटल्यामुळे केवळ हवामान बदल, अतिवृष्टी, महापूर किंवा ग्लाेबल वार्मिंग यांसारख्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर मानवी आराेग्याचे माेठे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते माेठ्या प्रमाणात हाेणारी जंगलताेड ही अनेक आजारांच्या प्रसारासाठी कारणीभूत आहे.
माणसांमध्ये सामान्य असलेले आजार वन्यप्राण्यांकडून येणारे आहेत. वन क्षेत्र घटल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत आले आहेत. त्यांचा संपर्क पाळीव प्राण्यांशी येत असून, त्यामुळे माणसेही बाधित हाेत आहेत. प्राण्यांवरती वाढणारे जंगलातील डास मानवांपर्यंत पाेहोचले आहेत. जंगलातील प्राण्यांमध्ये वाढणारे विषाणू, जिवाणू वेगवेगळ्या माध्यमातून माणसांमध्ये येत आहेत. पुढील जागतिक महामारी जंगलातून बाहेर पडू शकते आणि त्वरित जगभर पसरू शकते, अशी भीती सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केली.
जगभरातील संशाेधन काय सांगते
- १९९० च्या दशकात पेल्च्या एका भागात अचानक मलेरियाचा उद्रेक झाला. त्या भागातील घनदाट जंगलात रस्ता तयार करण्यासाठी वृक्षताेड केल्यामुळे हा उद्रेक झाल्याचे संशाेधकांचे मत हाेते.
- लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनच्या शास्त्रज्ञांच्या मते मॅकाक नावाच्या प्राइमेट्सकडून मलेरियाचा डास माणसांमध्ये पाेहोचला व जगभर पसरला.
- जंगलातून मानवामध्ये आजारांचे वाहक केवळ डास नाहीत, तर वटवाघूळ, सस्तन प्राणी (प्राइमेट्स), गाेगलगायीदेखील आजारांच्या वाहक आहेत.
- वटवाघळांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे मानले जाते, ज्याने लाखाे लोकांचा बळी घेतला. सार्सचा विषाणूदेखील वन्यप्राण्यांपासून मानवात आला.
- जंगल साफ केल्यानंतर या सर्व प्रजातींमध्ये संक्रमणाची गतिशीलता बदलते. वन क्षेत्रात जेवढ्या प्रजाती, तेवढे आजार अधिक.
- लॅटिन अमेरिकेत उद्रेक झालेला झिका विषाणू हा १९४० च्या दशकात युगांडाच्या जंगलातून उदयास आला.
- डासांमुळे पसरणारे डेंग्यू, चिकुनगुनिया, पिवळा ताप व इतर आजारदेखील आफ्रिकेच्या जंगलातून बाहेर आले असावेत.
- जगभरात २५ दशलक्षाहून अधिक लाेकांचा बळी घेणारा एड्स हा आजारदेखील झुडपी प्राण्यांचे मांस खाणाऱ्या चिंपांझीसारख्या सस्तन प्राण्यांमुळे मानवात आला.
मानवामध्ये असलेले बहुतेक आजार वन्यप्राण्यांकडून आलेले आहेत. वन्यप्राण्यांतून माकडात व त्यांच्याकडून माणसात आलेला कॅसनूर आजार. वटवाघळातून रेबीज, इबाेला आलेला आहे. रेबीजचे धाेके पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहेत, कारण वन्यप्राण्यांचा संपर्क वाढला आहे. डेंग्यू चिकुनगुनिया, येलाे फिव्हर, झिका, जापनीज एनसाफलायटिस हे आजार प्राण्यांमधून माणसात आले आहेत. जंगल कापले की जमीन गरम हाेते, ह्यूमॅडिटी वाढते, यामुळे डासांसह विषाणू, जिवाणू, फंगस यांची वाढ हाेण्यास चांगले वातावरण मिळते.
- डाॅ. हेमंत जैन, व्हेटर्नरी सर्जन