मानवी तस्करी, देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:06 PM2021-11-25T13:06:46+5:302021-11-25T13:17:29+5:30

दोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तर इतर सात महिलांना इतर कामासाठी बोलावण्यात आले होते. हावड्याचे दलाल सर्वांना सुरतला पाठवीत होते. सुरतचा दलालही सर्वांना वेगवेगळ्या शहरात रवाना करणार होता.

international human trafficking racket exposed in nagpur | मानवी तस्करी, देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

मानवी तस्करी, देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ महिला, एका बांगलादेशी पुरुषास अटकगुन्हे शाखा, एटीएसची कारवाई

नागपूर :मानवी तस्करी आणि देहव्यापाराची आंतरराष्ट्रीय टोळी गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. गुन्हे शाखेने तसेच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर धाड टाकून सुरतला जाणाऱ्या नऊ महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार हाती न लागल्यामुळे पोलीस याबाबत गोपनीयता बाळगत आहेत.

दहशतवाद विरोधी पथकाला मंगळवारी रात्री हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये देहव्यापार तसेच दुसऱ्या कामासाठी महिलांना सुरतला नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. एटीएसने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत सूचना दिली. पोलीस आयुक्तांच्या निर्देशावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी रेल्वेस्थानकावर कारवाई करण्याची योजना आखली. चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वेस्थानकावर धाड टाकली.

ही गाडी रात्री १० वाजता प्लॅटफॉर्मवर पोहोचली. पोलिसांना इंजिनच्या नंतर असलेल्या कोचमध्ये महिला असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यासोबत महिला आणि एका व्यक्तीचा फोटोही होता. तो व्यक्ती आणि महिला कोचमध्ये न दिल्यामुळे पोलीस चक्रावले. त्यांनी सर्व कोचची तपासणी केली. अर्धा तास तपास केल्यानंतर रेल्वेगाडीच्या मागील कोचमध्ये त्यांना महिला सापडल्या. पोलिसांनी नऊ महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले. त्यांना गुन्हे शाखेत आणून चौकशी केली असता ते सुरतला जात असल्याची माहिती मिळाली.

महिलांसोबत पाच मुले आहेत. सर्व २२ नोव्हेंबरला रात्री रेल्वेने स्वार झाले. त्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी ते बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांनी पायदळ आणि नदीच्या मार्गाने भारताच्या सीमेत प्रवेश केला. तेथून ते हावड्याला पोहोचले. त्यांना बांगलादेशच्या दलालाने हावड्याच्या दलालाचा नंबर दिला होता. दोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तर इतर सात महिलांना इतर कामासाठी बोलावण्यात आले होते. हावड्याचे दलाल सर्वांना सुरतला पाठवीत होते. सुरतचा दलालही सर्वांना वेगवेगळ्या शहरात रवाना करणार होता.

महिलांच्या मते, बांगलादेशात त्या खूप गरिबीत राहतात. पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्या भारतात आल्या. काही महिलांना अशाच प्रकारे अवैधरीत्या भारतात आणण्यात आले आहे. काही काळ थांबल्यानंतर त्या परत गेल्या. दुसऱ्यांदा काम मिळण्याचा भरवसा दिल्यावर त्या परत आल्या. हावडा आणि सुरतचा दलाल पकडल्या गेल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो. सध्या पोलिसांनी हव्या असलेल्या आरोपींविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्या(पीटा)नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्वजी दोरजे, अप्पर आयुक्त सुनील फुलारी तसेच उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हावड्यात तयार झाले बनावट आधारकार्ड

पोलिसांना मिळालेल्या महिला, पुरुषांना हावड्याच्या दलालाने बनावट आधारकार्ड तयार करून दिले होते. आधारकार्ड बनविण्यासह ठरलेल्या शहरात पोहोचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून २०-२० हजार रुपये घेण्यात आले होते. महिलांना काही व्यक्तींचे मोबाईल क्रमांक देण्यात आले होते. पोलिसांशी सामना झाल्यावर त्या व्यक्तींशी पती म्हणून बोलण्यास सांगितले होते. महिला त्या डमी पतीबाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत.

देहव्यापारातील युवती आहे अभियंता

देहव्यापारात अडकलेली एक युवती अभियंता आहे. दिसायला सुंदर असलेली ही युवती बांगलादेशातही देहव्यापार करीत होती. अधिक पैसे कमावण्यासाठी ती भारतात येण्यास तयार झाली. तिच्या मते, अनेक युवती देहव्यापारासाठी भारतात येतात. पोलिसांनी या कारवाईची बांगलादेशातील दूतावासाला सूचना दिली आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

Web Title: international human trafficking racket exposed in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.