आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 10:28 AM2020-02-21T10:28:45+5:302020-02-21T10:29:38+5:30
अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत.
प्रवीण खापरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या प्रमाणे मातेच्या उदरातून आपण जन्म घेतो, त्याच प्रमाणे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या भाषेच्या उदरातच जन्माला येतो. तीला आपली मातृभाषा म्हटली जाते आणि मातृभाषेविषयी प्रत्येकाला प्रचंड आस्था असते.
मात्र, अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत. जगपातळीवर प्रत्येक भाषांची एक मुळ प्रमाणभाषा असते आणि त्याला जोडून नजिकच्या प्रदेशातील स्थळ, काळ आणि वातावरणानुसार भाषेची लय बदलत जाते. त्यात त्या त्या भागातील म्हणींचा वापर होतो, त्या प्रदेशाला अनुसरूण शब्दांची भर पडली असते, तेथील नागरिकांचा स्व:भावधर्मही त्यात उतरतो. तिच लय बोलिभाषा म्हणून प्रचलित होते.
अशा बोलीभाषांची विशिष्ट लिपी नसते. प्रमाणभाषेच्या लिपितच या भाषा समाविष्ट होतात. जंगलात राहणाऱ्या आदिम जमातींच्या भाषांची स्वत:ची अशी लिपी नाही. या भाषाही बोलिभाषा म्हणून संबोधल्या जातात. पिढी दर पिढी या बोलिभाषा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आल्या आहेत. या बोलींमधील साहित्य हे पिढ्यांच्या स्मरणशक्तीवरच टिकून राहील्या. त्यात म्हणी, गाणी, दंतकथांचा समावेश होतो. या सगळ्या बोलीभाषा कुणाच्या तरी मातृभाषाच आहेत. अहिराणी, कोंकणी, वºहाडी, झाडीबोली, गोंडी, माणदेशी, मालवणी, तमिळनाडूमध्ये तंजावूर येथे बोलली जाणारी तंजावरी या भाषा मराठीतील बोलीभाषा आहेत.
हा गोडवा त्याच्या त्याच्या मातृभाषेचा आहे. मात्र, हा गोडवा पुढे राहील का? अशी भिती वाटायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे, शाळांतून बोलिभाषेला गावंढळ म्हटले जाऊन विद्यार्थ्यांच्या तोंडी प्रमाणभाषेचा आग्रह धरला जातो आणि ज्या भागात प्रमाणभाषेचे प्राबल्य आहे, तेथे पालकांकडून इंग्रजीचा अट्टहास धरला जात आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे प्रयत्न अद्याप फलित झालेले नाही आणि सरकारकडूनच मराठीला दुय्यम वागणूक दिली जाऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत.
जिथे जावे, तिथे गोडवा
प्रत्येक जिल्ह्णानूसार, जाती-धर्मानुसार भाषेच्या विशिष्ट शैलीही जपल्या जातात. जसे नागपूरची बोलीभाषा, अमरावतीपेक्षा भिन्न आहे. भंडारा, गोंदिया येथील भाषेची लहेजा आणि चंद्रपूर, गडचिरोलीपेक्षा वेगळाच भासतो. विदर्भाच्या पलिकडे गेले तर वाशिम, नांदेड, लातूर मध्ये भाषेचा स्वर बदललेला असतो. पुण्यापेक्षा मुंबईच्या बोलीत अंतर आहे. तिकडे पुन्हा धाराशिव, कोल्हापूर, सातारा येथील भाषेत भिन्नता सापडते आणि कोकणात वेगळ्या मराठी बोलीचा स्वर कानावर पडतो तर कोष्टी समाजाची कोष्टी बोली, कुणबी समाजाची कुणबी बोली, सिंध्यांची सिंधी बोली अन् मारवाड्यांची मारवाडी बोली याही कानावर पडतच असतात.
या दिनाचा संदर्भ
२१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा केला जातो. मुळात बांग्लादेशी नागरीकांच्या बॉन्ग्ला भाषा आंदोलनामुळे, हा दिवस युनेस्कोतर्फे सन २००० पासून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला नोव्हेंबर १९९९मध्ये मान्यता प्राप्त झाली. स्व:भाषा संवर्धन आणि बोलण्याचा अधिकार हा संदर्भ या मातृभाषा दिवसाच्या मागचा आहे.