International Nurses Day 2021: बरे झालेल्यांचे परत जाताना मिळणारे आशीर्वाद अमूल्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 07:42 AM2021-05-12T07:42:28+5:302021-05-12T07:44:06+5:30
Nagpur News वाॅर्डात रुग्ण भरती झाल्यानंतर ते बरे हाेऊन जाताना त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद हे अमूल्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रेरणा आणि जिद्द मिळते, अशी प्रतिक्रिया ‘नर्स डे’च्या पार्श्वभूमीवर ‘लाेकमत’कडे नाेंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १४ महिन्यांपासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. रुग्णालयांवरील भार वाढला आहे. परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. सेवा बजावताना अनेक कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला. या स्थितीतही कोविड रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी निरंतर कर्तव्य बजावत आहेत. यापैकीच एक परिचारिका आहेत रेणुका विनाेद बावणकर. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाल्यापासून या वॉर्डात त्या सेवा देत आहेत. या वाॅर्डात रुग्ण भरती झाल्यानंतर ते बरे हाेऊन जाताना त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद हे अमूल्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रेरणा आणि जिद्द मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘नर्स डे’च्या पार्श्वभूमीवर ‘लाेकमत’कडे नाेंदविली.
इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे पाच वॉर्ड आहेत. येथे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू झाल्यापासून बावणकर सेवा बजावत आहे. स्वत:सोबतच कुटुंबातील सदस्यांना संक्रमण होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात पीपीई किट घालून काम करताना त्रास होतो, पण रुग्णांची सेवा महत्त्वाची आहे. कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर, घरी जाताना रुग्णांचे मिळणारे आशीर्वाद अमूल्य आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून हीच खरी ईश्वर सेवा असल्याचा प्रत्यय येतो. याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कोरोना योद्ध्यांमुळेच आज कोरोनाबाधितांवर उपचार शक्य झाले आहेत.
स्वत:साेबतच कुटुंबाचीही जबाबदारी
रेणुका या १७ वर्षभरापासून आरोग्यसेवेत आहेत. सुरुवातीला पाच वर्षे बाभूळबन डिस्पेन्सरी मध्ये कार्यरत होत्या. मागील १२ वर्षांपासून इंदिरा गांधी रुग्णालयात कार्यरत आहेत. सुरुवातीला त्या कोरोना सर्व्हेच्या कामात होत्या. रेणुका बावणकर यांचे चार जणांचे कुटुंब आहे. पती, मुलगा व सासरे आहेत. सासरे ८४ वर्षांचे आहेत. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, तर मुलगा ११ वीत आहे. अडचणींचा सामना करून कर्तव्य बजावावे लागते.