सुपारीच्या तस्करीत आंतरराष्ट्रीय रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:01+5:302021-07-02T04:08:01+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंडोनेशियात घाण-कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकल्या जाणाऱ्या सुपारीची तस्करी करून ती विविध प्रांतातील नागरिकांना ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडोनेशियात घाण-कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकल्या जाणाऱ्या सुपारीची तस्करी करून ती विविध प्रांतातील नागरिकांना खाऊ घालणारे आंतरराष्ट्रीय तस्कर नागपुरातील व्यापाऱ्यांशी जुळले आहे. या तस्करांशी संबंधित विभागाचे काही भ्रष्ट अधिकारीही मधुर संबंध ठेवून आहेत. त्यामुळे लाखो सुपारी शाैकिनांच्या जीविताशी होणारा खेळ बिनबोभाट सुरू आहे. मात्र, सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे सुपारीच्या तस्करीत गुंतलेल्या रॅकेटचे धाबे दणाणले आहे.
सुपारीचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशियाचा क्रमांक अव्वल आहे. प्रचंड प्रमाणात येथे सुपारी उत्पादन होते आणि जगातील अनेक देशात सुपारीची निर्यातही केली जाते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण उत्पादनापैकी काही टक्के उत्पादन (सुपारी) निकृष्ट निघत असल्याने ही दर्जाहीन सुपारी इंडोनेशियातील उत्पादक अक्षरश: घान कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देतात. हीच शेकडो क्विंटल सुपारी तेथून उचलून मॅनमार (बर्मा)च्या रंगून पोर्टमधून गोरे-चंपाई आणि टियाहूंतून इम्फाळ आणि मिझोरममध्ये आणली जाते. तेथे सुपारी माफियांची वाहने आणि मजूर सज्ज असतात. अशा प्रकारे ही सुपारी भारतात आल्यानंतर ओरिसा, छत्तीसगडमार्गे ती नागपुरात आणली जाते.
---
उपराजधानीत प्रक्रिया
उपराजधानीत या सुपारीवर प्रक्रिया करणाऱ्या अनेक तस्करांच्या भट्ट्या आहेत. आरोग्यास अपायकारक असलेली ही सडकी सुपारी भट्टीत टाकून आणि विशिष्ट रसायन टाकून ती टणक तसेच शुभ्र बनविली जाते. त्यानंतर ती बारीक करून, तिला गुटखा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधित सुपारीमध्ये आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात खर्रात वापरली जाते. यातून कोट्यवधींची उलाढाल केली जाते.
---
मोठे नेटवर्क सक्रिय
हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात बिनबोभाट सुरू आहे. यात गुंतलेले कॅप्टन, बिलाल, आसिफ, कलीवाला, अण्णा, बंटी, जकिरसारखे अनेकजण मोठे नेटवर्क सांभाळून आहेत. दलाली करणारेही त्यांच्या दावणीला आहेत. त्यामुळे चुकून कधी कुणी छापा घातला तरी दलालांची मोठी फळी सक्रिय होते. विशेष म्हणजे, या गोरखधंद्याची चांगली माहिती असूनही संबंधित विभागातील काही भ्रष्ट अधिकारी कारवाई टाळतात.
----
सीबीआयच्या कारवाईमुळे खळबळ
सीबीआयने मुंबई, अहमदाबाद आणि नागपूरमध्ये केलेल्या कारवाईमुळे पहिल्यांदाच या नेटवर्कला धक्का बसला आहे. अनेक सुपारी तस्करांची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे सुपारीच्या तस्करीत गुंतलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय तस्करांशी धागेदोरे जुळलेल्यांंमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. लवकरच या संबंधाने अनेकांचे बुरखे फाटणार आहेत.
----